Banking News : अलीकडे, बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सरकारने जनधन योजना सुरू केल्यापासून बँक खातेधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून अगदी खेड्यापाड्यातील लोक देखील बँकिंग व्यवस्थेसोबत जोडले गेले आहेत. मात्र, अलीकडील काही वर्षांमध्ये फसवणुकीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
ऑनलाइन ठगीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान अशाच एका ऑनलाईन फसवणुकीच्या घटनेत माननीय सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाने फसवणुकीच्या एका प्रकरणात देशातील सगळ्यात मोठ्या सरकारी बँकेवर दंडात्मक कारवाई केली आहे.
सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात सुनावणी देताना एसबीआय बँकेला दंड भरण्याचे आदेश दिलेले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण हे प्रकरण नेमके काय आहे हे सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
याबाबतची अधिक माहिती अशी की आसाम मधील एका व्यक्तीने लुइस फिलिप ब्लेजर खरेदी केलं होत. त्याने हे ब्लेझर 2021 मध्ये खरेदी केले. मात्र त्याला हे ब्लेजर पसंत पडले नाही यामुळे तो हे ब्लेझर रिटर्न करू इच्छित होता.
पण त्या कालावधीत या सदरील कंपनीची वेबसाईट हॅक झाली होती. अशातच या व्यक्तीला एका अज्ञात इसमाचा फोन आला ज्याने आपण स्वतः लुइस फिलिप कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगितले. आणि या अज्ञात इसमाने त्या व्यक्तीला त्याच्या स्मार्टफोनमध्ये एक एप्लीकेशन इन्स्टॉल करायला सांगितले.
दरम्यान एप्लीकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या बँक खात्यातील सर्व रक्कम लंपास झाली. त्यानंतर त्या व्यक्तीला आपल्या सोबत फसवणूक झाली असल्याचे कळले आणि त्याने ताबडतोब बँकेशी संपर्क साधला. तसेच एसबीआय मध्ये याबाबत तक्रार दाखल केली.
पुढे एसबीआयकडून त्याला सूचित करण्यात आलं की तुझं अकाउंट ब्लॉक करण्यात आलं आहे. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात देखील तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच आसाम पोलिसांच्या सायबर शाखेकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला.
मात्र या व्यक्तीला त्याच्या खात्यातून कपात झालेले पैसे काही मिळू शकले नाहीत. पैसे परत न मिळाल्यानं अखेर या व्यक्तीने याबाबत आरबीआयकडे आणि त्यानंतर त्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात निकाल दिला असून एसबीआयला दंड भरण्याचे आदेश दिलेले आहेत.
या सुनावणी दरम्यान एसबीआय बँकेने हा सर्व प्रकार थर्ड पार्टी एप्लीकेशनच्या माध्यमातून घडला असून यात बँकेचा काहीही दोष नसल्याचे म्हटले होते मात्र असे असतानाही सुप्रीम कोर्टाने सदर व्यक्तीला पैसे वापस द्या असे आदेश बँकेला दिलेलें आहेत. माननीय न्यायालयाने एसबीआयला 94 हजार रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिलेले आहेत.