देशातील बँका देतात 5 प्रकारचे होम लोन, तुमच्यासाठी कोणते लोन ठरणार फायदेशीर ?

Home Loan Types : अनेकांचे घर बनवण्याचे स्वप्न असते. काही लोकांनी नवीन घर बनवलेले देखील असेल. मात्र काही लोक अजूनही नवीन घराच्या स्वप्नांसाठी अहोरात्र काबाडकष्ट करत असतील. अलीकडे मात्र नवीन घराचे स्वप्न महाग झाले आहे.

घरांच्या किमती वाढल्या असल्याने सर्वसामान्यांना आता घर घेण्यासाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. विशेष म्हणजे तज्ञ लोक देखील गृह कर्ज घेण्याचा सल्ला देत आहेत. गृह कर्ज घेणे हे काही अंशी फायदेशीर देखील ठरते. मात्र असे असले तरी ज्या लोकांना गृह कर्ज घ्यायचे असते त्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होतात.

बँका कोणत्या कारणांसाठी गृह कर्ज देतात, गृह कर्जाचे प्रकार किती असतात असा देखील प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. खरेतर आपण सर्वजण घर घेण्यासाठी बँकांकडून गृहकर्ज घेत असतो. घर घेण्यासाठी आवश्यक असलेला मोठा पैसा प्रत्येकालाच बचत करता येत नाही. यामुळे अनेक जण गृह कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात. पण तुम्हाला माहित आहे का की बँका 5 प्रकारचे गृहकर्ज देतात. या पाच गृहकर्जांमध्ये काय फरक आहे आणि आपण ते कधी घेऊ शकतो याच बाबत आज आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गृह कर्जाचे 5 प्रमुख प्रकार

 घरबांधणीसाठी गृहकर्ज :

बँकांच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी कर्ज दिले जाते. याला होम कन्स्ट्रक्शन लोन असे म्हणून ओळखले जाते. नावाप्रमाणे, हे कर्ज ज्यांना स्वतःचे घर बांधायचे आहे त्यांच्यासाठी असते.

यामध्ये प्लॉटची किंमत तसेच घर बांधण्याची किंमत समाविष्ट असू शकते. प्लॉट खरेदी केल्यानंतर एक वर्षाच्या आत कर्ज घेतल्यासच त्याची किंमत यात कव्हर केली जाते. ज्या लोकांना स्वतः घर बांधायचे असते अशा लोकांसाठी हे कर्ज फायदेशीर राहते.

घर विकत घेण्यासाठी गृहकर्ज :

ज्या लोकांना स्वतः घर बांधायचे नसते म्हणजेच रेडी घर खरेदी करायची असते किंवा कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेले घर खरेदी करायचे असते त्यांच्यासाठी हा गृह कर्जाचा प्रकार फायदेशीर ठरतो. नवीन फ्लॅट किंवा घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जाला गृह खरेदी कर्ज म्हणतात.

तुम्ही अशा प्रकारचे घर खरेदी करत असाल तर तुम्हाला बँकेकडून 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते. पण बँका सहजपणे 80 टक्क्यांपर्यंत कर्ज देतात. अशा प्रकारच्या कर्जाचा कालावधी 20 ते 30 वर्षांपर्यंत असू शकतो. म्हणजे जर तुम्हाला कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेले घर किंवा प्लॅट खरेदी करायचे असेल तर हे कर्ज तुम्ही घेऊ शकता आणि तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकता.

घर मोठे करण्यासाठी गृहकर्ज :

गृह कर्जाचे अनेक प्रकार आहेत. त्यातलाच हा देखील एक लोकप्रिय प्रकार आहे. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या सध्याच्या घराचा आकार वाढवायचा असेल तर तो यासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. या कर्जाला गृहविस्तार कर्ज म्हणतात. या कर्जाचा वापर करून तुम्ही तुमच्या सध्याच्या घराचा आकार वाढवू शकता.

घराच्या नूतनीकरणासाठी गृहकर्ज :

अनेक जण त्यांच्या सध्याच्या घराचे नूतनीकरण करतात. अशा लोकांसाठी हे कर्ज फायदेशीर ठरते. जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या सध्याच्या घराची दुरुस्ती, रंगरंगोटी किंवा नूतनीकरण करायचे असेल तर तो यासाठी बँकेकडून कर्ज घेऊ शकतो. यासाठी बँका गृह सुधार कर्ज देतात. या प्रकारच्या कर्जामुळे घराचे नूतनीकरण करणे शक्य होते. हे कर्ज कमी कालावधीसाठी दिले जाते. या अंतर्गत कमी रक्कम मंजूर होते.

ब्रिज होम लोन :

हा गृह कर्जाचा एक लोकप्रिय प्रकार आहे. हे कर्ज अल्पकालावधीसाठी मिळते. विद्यमान मालमत्ता विक्री करण्यापूर्वीच नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे गृह कर्ज घेतले जाते ते गृह कर्ज या प्रकारच्या कर्जात समाविष्ट होते.

हे गृहकर्ज विद्यमान मालमत्तेची विक्री करण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे निर्माण होणारी निधीची तफावत भरून काढण्यास मदत करते. यामुळेच या कर्जाला ब्रिज लोन म्हणतात. ब्रिज होम लोन सहसा अल्प कालावधीसाठी असते.

बँका हे कर्ज जास्तीत जास्त दोन वर्षांसाठी देतात. म्हणजेच जोपर्यंत सध्याची मालमत्ता विकली जात नाही तोपर्यंत हे कर्ज मिळते.