Mumbai Nagpur Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात हजारो किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. शेकडो किलोमीटर लांबीच्या महामार्ग प्रकल्पांमुळे राज्यातील रस्ते कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत झाली असून समृद्धी महामार्ग हा राज्यातील एक महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रोजेक्ट आहे. या एक्सप्रेस वे बाबत बोलायचं झालं तर 701 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प असून आत्तापर्यंत या मार्गाचा 625 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा 2022 मध्ये सुरू झाला, त्यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू झाला आणि पुढे 2024 मध्ये भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरू करण्यात आला. या महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा अजून प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला नाही. पण, स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण झालेला आहे.

लवकरच या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होण्याची शक्यता आहे. यामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास वेगवान होणार आहे. समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने खुला झाल्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्यातील विकासाला चालना मिळणार आहे. दरम्यान, याच समृद्धी महामार्गाच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यात आली आहे. या महामार्गावरील शहापूरातील अंबर्जे गावाजवळ असणाऱ्या पाचशे मीटर लांब बोगद्याच्या आत जलचर प्राण्यांची चित्रे काढण्यात आली आहेत. तर बोगद्याच्या बाहेरील भागात गेट वे ऑफ इंडियाची राॅक पेंटींग द्वारे प्रतीकृती साकारण्यात आली आहे.
सुमारे दोनशे फूट उंची व 70 हजार चौरस फूटांमध्ये साकारण्यात आलेली ही पेंटिंग प्रतिकृती पोदार थ्रीडी आर्ट यांनी तयार केली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने ही पेंटींग बनविण्यात आली आहे. यामुळे, समृद्धी महामार्गाचे सौंदर्य आणखी वाढणार असून गेटवे ऑफ इंडियाची ही रॉक पेंटिंग प्रवाशांसाठी प्रमुख आकर्षण ठरणार आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख अजून समोर आलेली नाही. पण, लवकरच या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख जाहीर होणार असून एप्रिलला खरं पर्यंत समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा सर्वसामान्यांसाठी खुला होईल असे बोलले जात आहे.