प्रवाशांसाठी मोठी बातमी! १५ जूनपासून कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळांमध्ये मोठा बदल, असे आहे नवीन वेळापत्रक

१५ जूनपासून २० ऑक्टोबरपर्यंत लागू होणाऱ्या कोकण रेल्वेच्या मान्सून वेळापत्रकात अनेक गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे बदल असून, गाड्या पूर्वीच्या वेळेपेक्षा लवकर किंवा उशिरा सुटणार आहेत.

Published on -

कोकण रेल्वे मार्गावर यंदाच्या मान्सूनसाठी रेल्वे प्रशासनाने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. पावसाळ्यात प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांच्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे नवे वेळापत्रक १५ जून २०२५ पासून लागू होणार असून, २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत कार्यरत राहील. पावसाळ्यात दरडी कोसळणे आणि रुळांवर पाणी साचण्याच्या धोक्यामुळे गाड्यांचा वेग कमी करून हे बदल करण्यात आले आहेत.

नवीन वेळापत्रकानुसार अशी आहे गाड्यांची वेळ

या नव्या वेळापत्रकानुसार अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळांमध्ये सुधारणा झाली आहे. उदाहरणार्थ, मडगाव ते मंगळुरू सेंट्रल एक्स्प्रेस आता पहाटे ४.०० ऐवजी ४.४० वाजता मडगावहून सुटेल. रत्नागिरी ते दिवा ही गाडी रत्नागिरीहून पहाटे ५.३५ ऐवजी ५.४० वाजता निघेल. तिरुवनंतपूरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ही गाडी तिरुवनंतपूरमहून सकाळी ९.१० ऐवजी ७.४५ वाजता सुटेल. मडगाव ते हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस मडगावहून सकाळी १०.०० ऐवजी ८.०० वाजता सुटेल, तर मडगाव ते मुंबई सीएसएमटी गाडी सकाळी ९.१५ ऐवजी ८.३० वाजता निघेल. सावंतवाडी रोड ते दिवा गाडी सावंतवाडीहून सकाळी ८.२५ ऐवजी ८.४० वाजता सुटेल.

दुपारच्या वेळेतही अनेक गाड्यांच्या वेळांमध्ये बदल झाले आहेत. मडगाव ते एलटीटी मुंबई गाडी आता दुपारी १२.३० ऐवजी सकाळी ११.३० वाजता सुटेल, तर मडगाव ते मुंबई सीएसएमटी गाडी दुपारी ३.०५ ऐवजी दुपारी १२.०० वाजता निघेल. वंदे भारत एक्स्प्रेस (मडगाव-मुंबई सीएसएमटी) दुपारी २.४० ऐवजी दुपारी १२.२० वाजता मडगावहून सुटेल. करमाळी ते एलटीटी गाडी दुपारी २.१० ऐवजी १.४० वाजता करमाळीहून निघेल. मंगळुरू जंक्शन ते मुंबई सीएसएमटी गाडी दुपारी २.०० ऐवजी ४.३५ वाजता मंगळुरूहून सुटेल, आणि मडगाव ते मंगळुरू सेंट्रल वंदे भारत एक्स्प्रेस संध्याकाळी ६.१० ऐवजी ५.३५ वाजता सुटेल.

संध्याकाळच्या गाड्यामध्येही बदल

संध्याकाळच्या गाड्यांमध्येही बदल झाले आहेत. सावंतवाडी रोड ते दादर गाडी रात्री ८.०० ऐवजी संध्याकाळी ५.५५ वाजता सावंतवाडीहून सुटेल. मडगाव ते मुंबई सीएसएमटी गाडी संध्याकाळी ७.०० ऐवजी ६.०० वाजता निघेल, तर सावंतवाडी रोड ते मडगाव गाडी संध्याकाळी ६.३५ ऐवजी ६.५० वाजता सुटेल. हे बदल प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आणि पावसाळ्यातील आव्हानांचा विचार करून करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सुधारित वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

प्रवाशांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट www.konkanrailway.com किंवा आयआरसीटीसी पोर्टलवर नवे वेळापत्रक तपासावे, जेणेकरून गाडी चुकण्याची किंवा उशिराने पोहोचण्याची गैरसोय टळेल. मान्सून काळात कोकण रेल्वे मार्गावर ट्रॅकमनची गस्त वाढवण्यात आली आहे, आणि रेल्वे रुळांच्या देखभालीवर विशेष लक्ष दिले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe