दहावी – बारावी बोर्ड परीक्षा सुरू होण्याआधीच महाराष्ट्र राज्य बोर्डाचा मोठा निर्णय ! आता….

Published on -

Breaking News : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षांबाबत अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे.

लेखी परीक्षेप्रमाणेच आता प्रात्यक्षिक परीक्षांमध्येही कॉपी, गैरप्रकार व अनियमितता रोखण्यासाठी विशेष भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्यातील सर्व संबंधित शाळांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षांत काही परीक्षा केंद्रांवर प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी मंडळाकडे प्राप्त झाल्या होत्या. अनुचित पद्धतीने गुण देणे, प्रयोग न करता गुणांकन करणे, जर्नलमधील त्रुटींकडे दुर्लक्ष करणे इत्यादी प्रकार समोर येत होते.

यामुळे आता प्रात्यक्षिक परीक्षांसाठी नेमण्यात येणाऱ्या बाह्य परीक्षकांची अदलाबदल करण्यात येणार आहे. खासगी किंवा विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्ये बाह्य परीक्षक म्हणून पाठवण्यात येणार आहे, तर अनुदानित शाळांतील शिक्षकांना खासगी शाळांमध्ये नेमण्यात येईल.

या निर्णयामुळे परीक्षकांची विश्वासार्हता वाढेल, विद्यार्थ्यांना त्यांची खरी गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळेल आणि योग्य गुणांकन होईल, असा मंडळाचा विश्वास आहे.

प्रात्यक्षिक परीक्षांदरम्यान भरारी पथक शाळांमधील प्रयोगशाळांची तपासणी करणार आहे. प्रयोगशाळांची छायाचित्रे, विद्यार्थ्यांचे प्रयोग करतानाचे फोटो, जर्नल तपासणीची माहिती तसेच परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया छायाचित्रांच्या माध्यमातून मंडळाकडे पाठवावी लागणार आहे.

यासाठी नुकताच बाह्य परीक्षकांसाठी विशेष उद्बोधन वर्ग आयोजित करण्यात आला होता. या वर्गात प्रात्यक्षिकांमध्ये कोणत्या बाबी तपासायच्या, गुण कसे द्यायचे आणि नियमांचे काटेकोर पालन कसे करायचे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, परीक्षा केंद्रांसाठीही नवे कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर पक्के कंपाउंड वॉल, स्वच्छ स्वच्छतागृहे, पुरेशी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्रत्येक वर्गखोलीत सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आले आहेत.

ज्या ठिकाणी भिंत पडलेली आहे, तेथे लोखंडी जाळी बसवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यवेक्षकांच्या मोबाईल कॅमेऱ्यांना झूमद्वारे जोडून वरिष्ठ अधिकारी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशाराही मंडळाने दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe