१५ तासांचा प्रवास फक्त साडेचार तासात ! महाराष्ट्राला मिळणार आणखी एक बुलेट ट्रेन, कसा असणार मार्ग?

Published on -

Bullet Train: राज्याला आणखी एका नव्या बुलेट ट्रेन ची भेट मिळणार आहे. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून आता महाराष्ट्राला आणखी एका नव्या बुलेट ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे.

ही बुलेट ट्रेन मुंबई ते हैदराबाद अशी धावणार आहे. दरम्यान या प्रस्तावित बुलेट ट्रेन कॉरिडोरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा कनेक्ट केले जाणार आहे. यामुळे या संबंधित परिसरातील प्रवासी वाहतुकीला अधिक वेग मिळणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हैदराबाद ते मुंबई दरम्यान प्रस्तावित हायस्पीड रेल्वे प्रकल्पाद्वारे थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडणी करण्याच्या योजनेला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनमार्फत या महत्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

या प्रकल्पासाठी हजारो कोटी रुपयांचा खर्च केला जाईल. मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन येत्या काही महिन्यांनी प्रत्यक्षात सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे. येत्या काळात मुंबई ते हैदराबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुद्धा सुरू होईल. पण सध्या हा प्रकल्प प्राथमिक टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नवी मुंबई विमानतळ येत्या काही महिन्यांनी व्यावसायिक वापरासाठी सुरू होणार आहे. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर विमान प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान या विमानतळ प्रकल्पाला रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जल मार्गाने कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे.

यासोबतच आता बुलेट ट्रेनची सुद्धा कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दरम्यान नव्या वर्षात नवी मुंबईतील प्रस्तावित रस्ते, रेल्वे , मेट्रो तसेच जलमार्गाचे बहुतांशी प्रकल्प पूर्ण होणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ या दरम्यान मेट्रोचा नवा मार्ग विकसित होणार आहे.

ही मेट्रोची गोल्डन लाईन अर्थात मेट्रो मार्ग क्रमांक ८ या दोन्ही ठिकाणांना सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी देणार आहे. हा मार्ग सुमारे ३४ किलोमीटर अंतराचा राहणार आहे. या मार्गाचा बहुतांशी भाग अंडरग्राउंड राहील.

दरम्यान, नवी मुंबई परिसरात वाढत असलेला औद्योगिक आणि वाणिज्यिक विकास तसेच नव्या विमानतळाचा जागतिक स्तरावरील उपयोग लक्षात घेता आता नवी मुंबई विमानतळ प्रस्तावित बुलेट ट्रेन कॉरिडोरला जोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.

हैदराबादहून थेट नवी मुंबई विमानतळावर पोहोचता यावे, यासाठी हायस्पीड रेल्वेचा स्वतंत्र प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असून केंद्र आणि राज्य सरकारची अंतिम मंजुरी प्रलंबित आहे. दोन्ही सरकारांत चर्चा सुरू असून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे संकेत मिळत आहेत. 

१५ तासांचा प्रवास फक्त साडेचार वाजता

मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई क्षेत्रातील नागरिकांना जलद गतीने हैदराबाद कडे जाता येणार आहे. यामुळे मुंबईची दक्षिण भारतासोबतची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होणार आहे. सध्या मुंबई ते हैदराबाद या सुमारे ७६७ किलोमीटरच्या अंतरावर प्रवास करण्यासाठी १५ तासांचा वेळ लागतो.

पण बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर हा प्रवास कालावधी साडेचार तासापर्यंत कमी होऊ शकतो. दरम्यान प्रस्तावित बुलेट ट्रेन कॉरिडोर वर एकूण ११ स्थानके विकसित केली जाणार आहेत. येत्या काळात या कॉरिडॉरचा संपूर्ण रूट आणि स्थानकांची सविस्तर माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe