Bullet Train : पुण्याचे बुलेट ट्रेनच्या नकाशावरचे महत्त्व लवकरच मोठ्या प्रमाणात वाढणार असून, शहराच्या पूर्व भागातील हडपसर परिसराला पुण्याचे प्रमुख बुलेट ट्रेन हब म्हणून विकसित करण्याची योजना पुढे आली आहे. मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद या दोन प्रस्तावित उच्चगती रेल्वे मार्गांसाठी हडपसर येथे अत्याधुनिक आणि भव्य स्थानक उभारण्यात येणार असून, या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च सुमारे ४ हजार कोटी रुपये असल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्र सरकारच्या हाय-स्पीड रेल्वे धोरणांतर्गत पुण्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. मात्र शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात जागेची अनुपलब्धता आणि वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, हडपसर हा पर्याय व्यवहार्य ठरला आहे.

पुणे–सोलापूर महामार्गालगत असलेला हा परिसर रस्ता, सध्याची रेल्वे लाईन तसेच भविष्यातील मेट्रो नेटवर्कशी सहज जोडला जाणार असल्याने येथे बुलेट ट्रेन स्थानक उभारणे अधिक सोयीचे मानले जात आहे.
या प्रकल्पाअंतर्गत मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हे दोन उच्चगती मार्ग एकत्रितपणे हाताळले जाणार आहेत. दुहेरी ट्रॅक, अत्याधुनिक सिग्नल प्रणाली, आधुनिक सुरक्षा व्यवस्था आणि ३०० ते ३५० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या गाड्या ही या बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये असतील.
लोणावळा परिसरातील भौगोलिक अडचणी लक्षात घेता, त्या भागात स्थानक न उभारता कामशेत परिसरात थांबा देण्याचा पर्यायही चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे.
हडपसरमधील बुलेट ट्रेन स्थानकामुळे पुणे शहराच्या पूर्व भागाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे. आयटी पार्क, औद्योगिक वसाहती, लॉजिस्टिक हब आणि वेगाने वाढणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना या हाय-स्पीड कनेक्टिव्हिटीचा मोठा लाभ होणार आहे.
तसेच हिंजवडी परिसरात स्वतंत्र बुलेट ट्रेन स्थानक उभारण्याचाही विचार सुरू असून, त्यामुळे पुण्याच्या पूर्व आणि पश्चिम भागांमध्ये जलद दळणवळण उपलब्ध होईल.
दरम्यान, देशभरात बुलेट ट्रेन नेटवर्क विस्तारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मुंबई–अहमदाबाद हा भारतातील पहिला बुलेट ट्रेन मार्ग जपानच्या सहकार्याने अंतिम टप्प्यात असून, त्यानंतर दिल्ली ते हावडा दरम्यान सुमारे १५०० किमी अंतर अवघ्या साडे सहा तासांत पार करणाऱ्या बुलेट ट्रेन मार्गाचे काम सुरू झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्याचा समावेश हाय-स्पीड रेल्वे नकाशावर झाल्याने उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.













