Chhatrapati Sambhajinagar News : गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा अधिक जाणवू लागला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ, गारपीट यांसारख्या संकटामुळे शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे. यामुळे अलीकडे अनेक लोक शेतीत काही कस नाही, शेती हा केवळ तोट्याचा व्यवसाय असं बोललं जात आहे. (Farmer Success Story)
निश्चितच शेती व्यवसाय आव्हानात्मक बनला आहे मात्र जर योग्य नियोजन केलं, चांगल मार्गदर्शन लाभलं तर शेतीचा व्यवसाय देखील इतर अन्य व्यवसायांप्रमाणेच शाश्वत उत्पन्न देणारा ठरू शकतो. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेतीतून लाख रुपयांची कमाई होऊ शकते हे अनेकांना दाखवून दिले आहेत. दरम्यान छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातूनही असंच एक उत्तम उदाहरण समोर येत आहे.

जिल्ह्यातील मौजे लाडसावंगी येथील बंडू पाटील पडूळ यांनी एक एकर जमिनीवर काकडी आणि शिमला मिरचीच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. बंडू पाटील यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनी पैकी एक एकर जमिनीवर शेडनेट हाऊस उभारले आहे. 20-20 गुंठ्याचे दोन शेडनेट हाऊस त्यांनी उभारले आहेत.
यामध्ये वीस गुंठेमधील शेडनेट हाऊस मध्ये काकडीची आणि वीस गुंठे जमिनीवर शिमला मिरचीची शेती त्यांनी केली आहे. यात काकडी मधून त्यांना साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे तर शिमला मिरची मधून अडीच लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडे शेडनेट सोडून 17 एकर जमिनीत फळबाग आहे.
डाळिंब, मोसंबी, टरबूज अशा विविध फळांची ते शेती करत आहेत. या फळ पिकातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. शिवाय, नुकतेच त्यांनी शेडनेट केले असून यामध्ये काकडी आणि सिमला मिरचीची लागवड केली असून यातूनही त्यांना लाखो रुपयांची कमाई झाली आहे.
पाटील सांगतात की ते 2005 पासून शेती करत आहेत. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. शिक्षणानंतर त्यांनी काही काळ छोट्या मोठ्या नोकऱ्या देखील केल्या आहेत. मात्र, त्यांना आधीपासून शेतीची आवड होती. त्यामुळे 2005 पासून ते पूर्णवेळ शेती करत आहेत.
सुरुवातीला शेतीमधून उत्पन्न कमी मिळत होतं. हळूहळू मात्र उत्पन्नात वाढ झाली आणि 2009 मध्ये त्यांनी ट्रॅक्टर घेतला. 2010 ते 2023 या 13 वर्षांच्या काळात त्यांनी फळबाग लागवडीतून तब्बल अडीच कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.
2016 मध्ये त्यांना डाळिंबाच्या बागेतून तब्बल 29 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. दरम्यान यंदा शेडनेटमध्ये लागवड केलेल्या काकडी आणि शिमला मिरचीच्या पिकातून त्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे.
त्यांना अर्धा एकर जमिनीतून सविस्तर काकडीचे उत्पादन मिळाले असून 22 रुपये प्रति किलो दराने साडेतीन लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले आहे. शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांनी त्यांच्या दोन्ही भाच्यांचे लग्न देखील लावून दिले आहेत. निश्चितच पाटील यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शन राहणार आहे.