DA Hike 2025 : मुंबईत राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या पावसाळी अधिवेशनात विविध बाबींवर सकारात्मक चर्चा केली जात आहे. दरम्यान यंदाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळेल असे बोलले जात आहे.
येत्या काही दिवसांनी राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, आता आपण राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार, याचा निर्णय कधी होणार ? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार?
मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला. त्यावेळी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली. या वाढीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका झाला आहे.
दरम्यान केंद्राच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा आणि महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 55% करण्यात आला आहे.
मात्र अजून केंद्राच्या धर्तीवर आपल्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढलेला नाही. परंतु मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आला आहे. वित्त विभागाने हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला असून लवकरच या संदर्भातील मंजुरी अपेक्षित आहे.
म्हणजेच पावसाळी अधिवेशनाच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते आणि राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा वाढू शकतो. यावेळी राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका होणार आहे. महत्त्वाची बाब अशी की ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहील.
महागाई भत्ता फरकाची रक्कम मिळणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% करण्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. याचा शासन निर्णय येत्या काही दिवसांनी निर्गमित होईल आणि जुलै महिन्याच्या पगारासोबत वाढीव महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे.
ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने जुलै महिन्याचा पगारासोबत महागाई भत्ता फरकाचा सुद्धा लाभ मिळेल. जर महागाई भत्ता वाढीचा लाभ जुलै महिन्याच्या पगारासोबत मिळाला तर जानेवारी ते जून या काळातील सहा महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम जुलै महिन्याच्या पगारा सोबतच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.