DA Hike 2026 News : होळीचा सण जवळ येत असतानाच केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मार्च महिन्यात भारतात होळीचा मोठा सण साजरा होणार आहे.
होळीच्या सणाला आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी असून या सणाच्या पार्श्वभूमीवर कोकण सहीत संपूर्ण महाराष्ट्रात मोठे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान होळीच्या सणाच्या आधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

दरवर्षी होळीच्या आधी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढतो आणि यंदा सुद्धा हीच परंपरा कायम ठेवली जाणार आहे. मार्च महिन्यात या वर्षाचा पहिला महागाई भत्ता वाढीचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.
मंडळी, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. महागाईची झळ फक्त सर्वसामान्यांनाच बसते असे नाही तर सरकारी कर्मचारी सुद्धा यामुळे पुरते हैराण आहेत.
दरम्यान आता वाढत्या महागाईने त्रस्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळावा या अनुषंगाने केंद्र सरकारकडून महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) यामध्ये २ टक्क्यांची वाढ जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही महागाई भत्ता वाढ ऑल इंडिया कंज्यूमर प्राईज इंडेक्स च्या आधारावर होईल. दरम्यान लेबर ब्युरो कडून हे इंडेक्स नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. लेबर ब्युरोने डिसेंबर २०२५ मधील ‘ऑल इंडिया कंज्युमर प्राईस इंडेक्स’ (AICPI) ची आकडेवारी जाहीर केली आहे. यानुसार सध्याचा ५८ टक्के असलेला महागाई भत्ता जानेवारी २०२६ पासून ६० टक्क्यांवर जाऊ शकतो.
सरकारकडून जीआर कधी निघणार?
महत्त्वाचे म्हणजे, या वाढीची अधिकृत घोषणा जरी मार्च २०२६ मध्ये अपेक्षित असली तरी ती जानेवारी २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव पगारासोबतच जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची थकबाकीही मिळणार आहे. यामुळे लाखो केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात सणासुदीच्या काळात जादा रक्कम पडणार आहे.
महागाई भत्ता वाढीचा लाभ कधीपासून मिळणार
२ टक्के DA वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर दिसून येतो. उदाहरणार्थ, ज्यांचे मूळ वेतन २० हजार रुपये आहे, त्यांच्या मासिक पगारात सुमारे ४०० रुपयांची वाढ होईल. तर ५० हजार रुपयांचे मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा सुमारे १ हजार रुपयांचा फायदा होणार आहे.
उच्च वेतन गटात ही वाढ आणखी लक्षणीय ठरणार असून, १ लाख रुपयांचे मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा २ हजार रुपयांची वाढ होईल. विशेष बाब अशी की ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मार्च महिन्यात याचा जीआर निघाला तरी सुद्धा ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहिल आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून थकबाकी मिळणार आहे.
पेन्शनधारकांना पण मिळणार दिलासा
केवळ कर्मचारीच नव्हे, तर देशातील लाखो निवृत्तीवेतनधारकांसाठीही ही वाढ ‘होळीचं गिफ्ट’ ठरणार आहे. महागाई सवलतीत (DR) २ टक्के वाढ झाल्यास ज्येष्ठ नागरिकांच्या मासिक पेन्शनमध्येही थेट वाढ होईल.
वाढत्या औषधखर्च, दैनंदिन गरजा आणि सणासुदीच्या खर्चासाठी ही रक्कम मोठा आधार देणारी ठरेल. दरवर्षी केंद्र सरकार जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्याचा आढावा घेते.
हा भत्ता पूर्णपणे ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित असल्याने महागाईनुसार कर्मचाऱ्यांचे जीवनमान संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे यंदाची संभाव्य वाढ कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी निश्चितच दिलासादायक ठरणार आहे.













