DA Hike : गेल्या वर्षी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पाच टक्क्यांनी वाढवण्यात आला. पहिल्यांदा मार्च महिन्यात जीआर निघाला ज्यानुसार जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवत 55% करण्यात आला.
नंतर ऑक्टोबर महिन्यात जीआर आला ज्याद्वारे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवत 58% एवढा करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे जानेवारी 2026 पासून किती महागाई भत्ता वाढणार यासंदर्भात सुद्धा आता आकडेवारी समोर येत आहे.

एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार या जानेवारीपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन ते पाच टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जुलै 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीमधील एआयसीपीआयची आकडेवारी समोर आली आहे.
तसेच, लवकरच डिसेंबर महिन्याची पण आकडेवारी समोर येईल. त्यानंतर मग प्रत्यक्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या जानेवारीपासून किती वाढणार हे क्लिअर होणार आहे. अशी सारी परिस्थिती असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मात्र अजूनही 55% एवढाच आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून च्या महागाई भत्ता वाढीची अजूनही प्रतीक्षा आहे.
दिवाळीपासून राज्य कर्मचारी प्रतीक्षेत!
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या टप्प्यात महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार अशी आशा होती पण नवं वर्ष सुरू होऊनही राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएवाडी बाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 58% झाला आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांनाही लवकरच याचा लाभ मिळायला हवा अशी मागणी कर्मचारी संघटनांनी लावून धरली आहे.
फेब्रुवारी महिन्यात हातात येणार वाढीव रक्कम
दरम्यान, आता याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे ज्यात राज्यातील सरकारी, निमसरकारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना जानेवारी महिन्याच्या पगारांसोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारात महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळेल असा दावा होतोय. महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजेच 16 जानेवारीनंतर राज्य सरकार याचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत याचा जीआर जारी होईल आणि त्यानंतर या महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा तीन टक्के डीए वाढीचा जीआर या महिन्यात जारी होणार असला तरी देखील ही वाढ जुलै 2025 पासून लागू राहील म्हणजेच जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे.













