Edible Oil : केंद्र सरकारच्या Budget 2026 च्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा मोठा फटका बसताना दिसत आहे. दैनंदिन वापरातील अत्यावश्यक असलेल्या खाद्यतेलांच्या किमतींनी पुन्हा एकदा उसळी घेतली असून गृहिणींसह सर्वसामान्य ग्राहकांच्या चिंता वाढल्या आहेत.
कोणताही सण-उत्सव नसतानाही शेंगदाणा, सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे घरगुती बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलांच्या किमती तुलनेने स्थिर असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता.

मात्र ही स्थिरता आता संपुष्टात आली असून बाजारात हळूहळू सर्वच प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात वाढ जाणवू लागली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही आठवड्यांत दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदा पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका तेलबियांना बसला आहे. काही भागांत अपेक्षित पावसाचा अभाव तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे भुईमूग आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
परिणामी बाजारात कच्च्या मालाची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम खाद्यतेलांच्या किमतींवर झाला आहे. विशेषतः शेंगदाण्याची आवक कमी झाल्याने शेंगदाणा तेलाच्या दरात मोठी वाढ नोंदवली जात आहे.
सध्या बाजारात सोयाबीन तेल 136 ते 145 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात असून सूर्यफूल तेलाचे दर 143 ते 150 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.
सर्वाधिक महागाई शेंगदाणा तेलात पाहायला मिळत असून त्याचे दर 170 ते 210 रुपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहेत. सणासुदीचा हंगाम नसतानाही अशी दरवाढ झाल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवाढीमागे केवळ देशांतर्गत कारणेच नव्हे, तर जागतिक बाजारातील घडामोडीही कारणीभूत ठरत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या खाद्यतेलांच्या किमती वाढत असून त्याचा परिणाम भारतीय बाजारावर होत आहे.
याशिवाय केंद्र सरकारकडून आकारले जाणारे 20 टक्के आयात शुल्क, डॉलरच्या वाढत्या किमती आणि आयातीचा वाढलेला खर्च यामुळेही खाद्यतेल महाग होत आहे.
ही परिस्थिती लवकर आटोक्यात आली नाही, तर येत्या काळात खाद्यतेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्पाआधीच महागाईचा फटका बसलेल्या सामान्य नागरिकांना पुढील काळात घरगुती खर्च अधिक काटेकोरपणे नियोजित करावा लागणार असल्याचे चित्र आहे.













