Educational Documents : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आज आम्ही एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. शैक्षणिक कागदपत्रांवर काही चूक झाली असेल तर ती चूक कशी दुरुस्त करायची याबाबत आज आपण डिटेल माहिती समजून घेणार आहोत. खरे तर शाळेच्या दाखल्यात अनेकदा नावात चूक झालेली असते किंवा मग जन्मतारखेत चूक झालेली असते.
दरम्यान ही चूक भविष्यात विद्यार्थ्यांसाठी मोठी डोकेदुखी सिद्ध होते. कारण की शाळेच्या दाखल्यात झालेली चूक ताबडतोब बदलता येत नाही, यासाठी एक स्पेशल पद्धत आहे त्या पद्धतीनुसारच शाळेच्या दाखल्यातील जन्म तारखेमधील किंवा नावातील चूक दुरुस्त करता येते.

महत्त्वाची बाब म्हणजे जर शाळेच्या दाखल्यावर खाडाखोड झाली तर थेट फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो. यामुळे जर तुमच्याही शाळेच्या दाखल्यात अशी काही मेजर चूक झालेली असेल तर तुम्ही कायदेशीर प्रक्रिया फॉलो करायला हवी अन्यथा तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता.
त्यामुळे तुमचे शैक्षणिक करिअर सुद्धा गोत्यात येऊ शकते. खरेतर, राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलिंग, जन्मतारीख किंवा पालकांची माहिती चुकीची नोंदवली जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
शाळेच्या दाखल्यातील या चुका सहसा प्राथमिक नोंदणीतच होतात. पण,पहिलीच्या इयत्तेत होत असलेल्या प्राथमिक नोंदणीतील एका छोट्याशा चुकीचा मोठा फटका विद्यार्थ्यांना बसतो. त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
नोकरीसाठीचा अर्ज, शिष्यवृत्ती, पासपोर्ट किंवा सरकारी कागदपत्रांच्या पडताळणीवेळी शाळेच्या दाखल्यात झालेली छोटीशी चूक विद्यार्थ्यांना नाहक त्रास देते. अनेक पालक सांगतात की, शाळेतील प्रवेशाच्या घाईगर्दीत फॉर्म भरताना छोट्या चुका घडतात. तर काहीवेळा शाळा प्रशासनाकडून नावाचे स्पेलिंग चुकीचे नोंदवले जाते.
एकदा हे नाव किंवा जन्मतारीख शालेय रेकॉर्डमध्ये चुकले, की ते दुरुस्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी प्रक्रिया पार करावी लागते. दुरुस्तीकरिता मूळ प्रमाणपत्रे, प्रतिज्ञापत्र, राजपत्र अधिसूचना, वर्तमानपत्रातील बदलाचा उल्लेख, अद्ययावत ओळखपत्र अशी कागदपत्रांची यादी सादर करावी लागते.
अनेक पालकांना या प्रक्रियेची माहिती नसल्याने शाळेतून शैक्षणिक विभागाकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. परीक्षा मंडळ किंवा विद्यापीठ आवश्यक पडताळणीनंतर मंजुरी देते. ही संपूर्ण प्रक्रिया किमान एका महिन्याचा कालावधी घेते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाचे निर्णयही लांबणीवर पडतात.
शिक्षणतज्ज्ञ सांगतात की, दहावीचे प्रमाणपत्र हे अंतिम मानले जाते. दहावीनंतर विद्यार्थ्यांच्या नावात किंवा जन्मतारीखेत बदल करायचा असल्यास केवळ कायदेशीर मार्ग म्हणजे राजपत्र. त्यामुळे बालवयातील एक साधी चूक आयुष्यभराचा प्रश्न बनण्याची भीती पालकांना वाटते.
विशेष म्हणजे काही पालक स्वतःच शाळेच्या दाखल्यावर नावे दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात; मात्र ही “खोडाखोड” फौजदारी गुन्हा ठरतो. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. दरवर्षी अशा दुरुस्तीच्या शेकडो अर्ज परीक्षा मंडळाच्या दारात दाखल होत आहेत. शिक्षण विभागाने या प्रक्रियेला अधिक सुलभ आणि ऑनलाइन रूप द्यावे, अशी विद्यार्थ्यांची व पालकांची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना चूक दुरुस्त करायची असल्यास काय करावे?
पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या दाखल्यात बदल करण्यासाठी परीक्षा बोर्ड किंवा विद्यापीठाकडे अर्ज करता येतो. यासाठी विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात.
शैक्षणिक रेकॉर्डमध्ये बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रांसह परीक्षा बोर्ड किंवा विद्यापीठाकडे अर्ज करावा लागतो आणि त्यानंतर मग शैक्षणिक कागदपत्रांमध्ये बदल केला जातो. महत्वाची बाब म्हणजे पहिली ते दहावीपर्यंतच शैक्षणिक नोंदीमध्ये बदल करण्याची मुभा मिळते. दहावीच्या प्रमाणपत्रावर विद्यार्थ्यांचे नाव आले की मग तेथून पुढे फक्त राजपत्र करूनच नाव बदलता येऊ शकते.













