Electric Vehicle Tax Free : अलीकडे महाराष्ट्रात तसेच देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य दाखवत आहेत. दुसरीकडे पर्यावरणासाठी सुद्धा इलेक्ट्रिक वाहने फायद्याची आहेत. यामुळे सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देताना दिसते.
इंधनाच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात असून याच अनुषंगाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे.

इलेक्ट्रिक वाहनांवरील कर माफ
मुख्यमंत्री महोदयांनी विधान परिषदेत मोठी घोषणा करत इलेक्ट्रिक वाहनांवरील कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री करण्याचा निर्णय सरकारकडून देण्यात आला आहे. दरम्यान आता आपण सरकारने नेमका काय निर्णय घेतलाय
खरेतर, विधिमंडळाच्या सभागृहात पर्यावरणविषयक चर्चा सुरू असताना शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार अनिल परब यांनी इलेक्ट्रिक वाहनांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यालाच उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहणे टॅक्स फ्री होणार असल्याचे सांगितले.
प्रदूषण कमी करण्यास मदत
सध्या ३० लाख रुपयांपर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनांवर ६ टक्के कर लावला जातो. मात्र, हा कर मागे घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील नागरिकांनी अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करावीत आणि प्रदूषण कमी करण्यास मदत करावी, यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी यापूर्वीच अनुदान देण्यात येत आहे, मात्र आता करमाफीमुळे नागरिकांना अधिक फायदा होणार आहे. याशिवाय, राज्यातील सर्व सरकारी कार्यालये आणि मंत्र्यांची वाहने देखील इलेक्ट्रिक असतील, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढणार
यामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल आणि पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात असून, प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छ ऊर्जेचा वापर यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
नक्कीच महाराष्ट्र राज्य शासनाच्या या निर्णयाचा राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. फडणवीस सरकारने विधिमंडळात सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिक वाहणे टॅक्स फ्री केली तर इलेक्ट्रिक वाहनांचा खप तर वाढणारच आहे शिवाय सर्वसामान्यांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे. सर्वसामान्यांना कमी किमतीत इलेक्ट्रिक वाहने खरेदी करता येतील.