EPFO Interest Rate : महागाईच्या झळा बसत असतानाच सर्वसामान्यांसाठी फेब्रुवारी महिना दिलासा देणारा ठरू शकतो. एक फेब्रुवारी 2025 रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य पगारदार लोकांसाठी रेपो रेट मध्ये कपात करून सुखद धक्का दिला.
आता रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. याचा परिणाम म्हणून आता देशातील अनेक बँकांनी आपल्या विविध कर्जाचे व्याजदर सुद्धा कमी केले आहेत. त्यात आता आणखी एका आनंदवार्ता कानावर पडणार आहे, यामुळे सर्वसामान्य नोकरदार मंडळीच्या आनंदात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) व्याजदर वाढीची घोषणा करणार आहे, ज्याचा थेट फायदा नोकरदार वर्गाला होऊ शकतो. सरकारने याबाबतचा निर्णय घेतला तर देशभरातील कोरोडो नोकरदारांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
28 फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक
नोकरदारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजना सुरू केली आहे. यात कर्मचाऱ्यांचा काही भाग जमा केला जातो अन त्यात कंपन्यांकडून देखील योगदान दिले जाते.
दरम्यान कर्मचारी आणि कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या या योगदानावर निश्चित व्याजदर लागू केला जातो. आता 28 फेब्रुवारी 2025 रोजी ईपीएफओच्या बोर्डाची बैठक होणार असून त्यात व्याजदर वाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. यामुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या बचतीवर सकारात्मक परिणाम होईल.
सलग दुसऱ्या वर्षी व्याजदर वाढणार
खरेतर EPFO वरील व्याजदर वाढीचा निर्णय घेतला तर सलग दुसऱ्या वर्षी व्याजदर वाढणार आहे. यापूर्वीही सरकारने ईपीएफओवरील व्याजदरात वाढ केली आहे. 2022-23 मध्ये हा दर 8.15 टक्के होता, तर 2023-24 मध्ये तो 8.25 टक्क्यांवर नेण्यात आला. त्यामुळे सध्या कर्मचारी आपल्या पीएफ ठेवींवर 8.25 टक्के दराने व्याज मिळवत आहेत. आता ही वाढ 8.35 टक्क्यांपर्यंत होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ
जर व्याजदरात 0.10 टक्क्यांची वाढ झाली, तर कर्मचारी अधिक बचत करू शकतील. मोठ्या ठेवी असलेल्या कर्मचाऱ्यांना याचा अधिक फायदा होईल. त्यामुळे नोकरदार वर्ग या संभाव्य निर्णयाकडे उत्सुकतेने पाहत आहे.
सरकारचा अंतिम निर्णय महत्त्वाचा
EPFO व्याजदर वाढवणार अशा चर्चा सुरू असल्या तरी अद्याप सरकारने अधिकृतपणे व्याजदर वाढीची घोषणा केलेली नाही. पण, सरकारने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्यास, हे नोकरदारांसाठी मोठे आर्थिक पाठबळ ठरू शकते.
म्हणून आता 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ईपीएफओच्या बैठकीकडे संपूर्ण नोकरदार वर्गाचे लक्ष लागले आहे. या बैठकीत नेमका काय निर्णय होणार हे पाहणे साऱ्यांसाठीच महत्वाचे असेल.