ब्राझीलमध्ये नुकतीच एका गायीची विक्री झाली असून ती जगातील सर्वात महागडी गाय ठरली आहे. या पांढऱ्याशुभ्र, अत्यंत सुंदर आणि मजबूत गायीची किंमत ३१ कोटी रुपये आहे.विशेष म्हणजे ही गाय भारतीय प्रजातीची आहे. तिच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे जगभरात तिची प्रचंड मागणी आहे.
ही महागडी गाय कोणती आहे?
ब्राझीलच्या मिनास जेरायज राज्यात नेल्लोर प्रजातीच्या ‘वियातिना १९’ नावाच्या गायीने इतिहास रचला आहे. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिला जगातील सर्वात महागडी गाय म्हणून नोंदवण्यात आले आहे.
वियातिना १९ चे खास वैशिष्ट्ये
अत्यंत भारी वजन
ही गाय १,१०१ किलो वजनाची असून, नेल्लोर प्रजातीच्या इतर गायींपेक्षा जवळपास दुप्पट वजनाची आहे.
तगडी शारीरिक रचना
मजबूत स्नायू, उंची आणि आकर्षक पांढऱ्या रंगामुळे ही गाय खूपच दुर्मिळ मानली जाते.
उष्णता सहन करण्याची क्षमता या गायीच्या त्वचेमुळे तिला उष्णतेपासून संरक्षण मिळते. त्यामुळे ती कोणत्याही हवामानात सहज तग धरू शकते.
विशेष ऊर्जा स्रोत
तिच्या खांद्यावर विशेष फॅट स्टोअर असते. जे तिला अतिरिक्त शक्ती पुरवते.
नेल्लोर प्रजाती
नेल्लोर प्रजातीचा उगम भारतात झाला असून विशेषतः आंध्र प्रदेशात ही प्रजाती आढळते. ह्या गायी खूप ताकदवान असतात.उष्ण किंवा थंड हवामानात सहज राहू शकतात आणि त्यांचं मांसही जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. त्यामुळेच ब्राझीलसह संपूर्ण जगभर नेल्लोर प्रजातीच्या गायींना मोठी मागणी आहे.
३१ कोटींच्या किमतीमागचं रहस्य काय?
ही गाय दुर्मिळ असल्यामुळे तिच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तिला उत्तम दर्जाचा आनुवंशिक वारसा लाभला आहे.त्यामुळे तिच्या पुढच्या पिढ्याही अतिशय शक्तिशाली असतील. तिची दूध देण्याची क्षमता आणि आरोग्यदायी वैशिष्ट्ये जगभरातील प्रजनन केंद्रांसाठी अमूल्य मानली जातात.
३१ कोटी रुपयांत काय काय खरेदी करता येईल?
रोल्स रॉयस, बेंटले आणि फेरारी मिळून एक संपूर्ण सुपरकार कलेक्शन, मुंबईत आलिशान सी-फेसिंग फ्लॅट, एका मोठ्या व्यवसायासाठी भांडवल,शेकडो एकर शेती किंवा एक प्रायव्हेट आयलंड इत्यादी. यावरून आपल्याला या गाईचे महत्त्व कळते.
विकत घेणाऱ्याचे नाव मात्र गोपनीय
ही गाय विकत घेणाऱ्या व्यक्तीचे नाव अजूनही गोपनीय ठेवले गेले आहे. मात्र एवढ्या मोठ्या किमतीची गाय विकत घेणारा हा व्यवहार जगभरात चर्चेचा विषय बनला आहे.