Explained : ४५० कोटींचं स्मारक, आयटी पार्क, धरणे… नगरला मिळणार मोठं पॅकेज ?

Published on -

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. दुपारी साडेबारा वाजचा सुरु होणारी ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सुमारे दीड-दोन कोटी खर्च केलेली ही बैठक सुमारे दीड तास चालेल, असे सांगितले जात आहे. या बैठकीसाठी जर्मन हँगर प्रकारचा मंडप उभारण्यात आला आहे.

याच जर्मन हँगर मंडपात नगर जिल्ह्यासाठी काहीतरी चांगले मिळावे, अशी नगरकरांची अपेक्षा आहे. या बैठकीत नगरकरांना काय काय मिळेल व काय-काय मिळावे, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

चौंडी येथे मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्री, विविध विभागांचे सचिव, आमदार यांच्यासाठी वातानुकुलित कक्ष उभारले आहेत. साडेतीन हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभारण्यात आला आहे. वास्तविक, जामखेड तालुका हा अवर्षणप्रणव तालुका म्हणून ओळखला जातो. या दुष्काळी तालुक्यात विकासकामांची वाणवाच आहे. पाणी नसल्याने दरडोई उत्पन्न कमी असलेल्या या तालुक्यात एवढा मोठा कार्यक्रम प्रथमच होत असल्याने नगरकरांच्या या कार्यक्रमाकडे नजरा लागल्या आहेत. या कार्यक्रमातून नगरच्या हाती काहीतरी लागावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गेल्या आठवड्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या बैठकीत नगरसाठी कोणकोणत्या मागण्या केल्या जातील, याची यादीच दिली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सृष्टी, संत ज्ञानेश्वर सृष्टी, भुईकोट किल्ला राज्य सरकारकडे हस्तांतरण करून त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे. ती मागणी या बैठकीत होऊ शकते व ती पूर्णही होऊ शकते.

याशिवाय श्रीगोंदे येथील पेडगाव किल्ला येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक बांधण्याची मागणीही या बैठकीत पूर्ण होऊ शकते. जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांना मंजुरी, जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारणे, हे प्रमुख प्रकल्प मंजुरीसाठी मांडले जाणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती.

याशिवाय अहिल्यादेवींच्या जन्मशताब्दीनिमित्त जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यात आयटी पार्क तयार करावे, एमआयडीसीमधील उद्योगांना चालना मिळावी, यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून लटकलेली कर्जत-जामखेड एमआयडीसीही लवकरच पूर्ण क्षमतेने सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे जिल्ह्याच्या ठिकाणी मोठे स्मारक व्हावे, असा ४५० कोटींचा आराखडा तयार केला आहे, असेही मंत्री विखे यांनी सांगितले होते.

याशिवाय नगर जिल्ह्यातील पाण्याचे महत्त्वाचे प्रश्नही या बैठकीतून मार्गी लागण्याची शक्यता आहे. नदी खोऱ्यातील धरणांमध्ये पाण्याची तूट भरून काढणे, हाच पाणीटंचाईवर मात करण्याचा उपाय आहे. त्यादृष्टीने राज्य सरकाराने समुद्रात वाया जाणारे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने गोदावरी खोऱ्यात चार नदीजोड प्रकल्प राबवविले जाणार आहेत. चितळे समितीने १२ धरणे उभी करण्याचा प्रस्वात त्यावेळच्या तत्कालीन सरकारला दिला होता.

मात्र पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी पावसाळ्यात समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. कारण गोदावरी नदी खोऱ्यातील चार नदीजोड प्रकल्प झाले तर नगर जिल्ह्याला त्याचा मोठा फायदा होणार आहे. धरणातील पाणीसाठाही वाढणार आहे.

त्यापूर्वी नगर जिल्ह्यातील मुळा धरणातील गाळ काढण्याचा निर्णय झाला आहे. या मोहिमेलाही चौंडीतील बैठकीत वाढीव निधी मिळून हे काम लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. एकंदर चौडीतील बैठकीतून नगर जिल्ह्यातील पाणी, रस्ते, शेती आणि उद्योग हे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालकमंत्री विखे सांगताहेत ते, नगर जिल्ह्यातील सगळेच प्रश्न मार्गी लागले तर नगर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe