Explained Karjat Politics : रोज काही ना काही राजकीय समिकरण बदलणारा मतदारसंघ म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड. विद्यमान सभापती व भाजपचे नेते राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्यात येथे रोज कलगीतुरा रंगतो. कर्जत नगरपंचायतीच्या गटनेता बदलाचा वाद, आता थेट उच्च न्यायालयात गेला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत थोडक्यात पराभव झाल्यानंतर भाजपचे नेते राम शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा ताकद दिली.
त्यांना विधान परिषदेचे सभापती करुन आ. रोहित पवारांची पुन्हा कोंडी केली. सभापती झाल्यानंतरही राम शिंदे यांनी आपल्या मतदारसंघातील लक्ष्य कमी केले नाही. त्यानंतर कर्जत नगरपंचायतीत सत्तांतर झाले. या सत्तांतराला राम शिंदे हेच कारणीभूत असल्याचा आरोप, राष्ट्रवादीने केला. आता मिनी लोकसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. गेल्यावेळी कर्जत पंचायत समितीवर रोहित पवारांची सत्ता होती. त्यामुळे यंदा या पंचायत समितीत व जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये काय होऊ शकते? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

निवडणूक कोणतीही असो, कधी रोहित पवार तर कधी राम शिंदे या नेत्यांच्या बाजूने झुकणारा तालुका म्हणून कर्जत ओळखला जातो. गेल्या पंचवार्षिकला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत या तालुक्यातून चार जिल्हा परिषद सदस्य व आठ पंचायत समिती सदस्य निवडून गेले होते. त्यात राष्ट्रवादी व भाजपचे समसमान बलाबल होते. यंदा मात्र मतदारसंघ पुनर्रचनेत या तालु्क्यातील बऱ्याच गावांची तोडफोड करण्यात आली आहे. यंदा जिल्हा परिषदेचा एक व पंचायत समितीचे दोन गण वाढले आहेत. त्यामुळे यंदा पाच जिल्हा परिषद गटात व 10 पंचायत समिती गणांत टशन रंगणार आहे.
मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर 2022 साली जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. तेच आरक्षण कायम राहिले तर अनेक दिग्गजांची पंचायत होणार आहे. अनेकांन निवडणूक लढविण्यासाठी दुसरा गण किंवा गट शोधावा लागणार आहे. आता 2022 चे आरक्षण नेमके कसे होते, ते आपण पाहूयात…
कर्जत जिल्हा परिषद गटाचे आरक्षण असे आहे…
1. कुळधरण गट- सर्वसाधारण
2. मिरजगाव गट- अनुसूचित जाती महिला
3. कोरेगाव गट- अनुसूचित जाती
4. चापडगाव गट- अनुसूचित जाती
5. राशीन गट- ओबीसी महिला
कर्जत पंचायत समिती गणनिहाय आरक्षणात असे आहे…
1. निमगाव गांगर्डा गण- सर्वसाधारण महिला
2. मिरजगाव गण- सर्वसाधारण महिला
3. चापडगाव गण- सर्वसाधारण
4. टाकळी खंडेश्वरी गण- सर्वसाधारण महिला
5. कोरेगाव गण- सर्वसाधारण
6. आळसुंदे गण- ओबीसी महिला
7. कुळधरण गण- अनुसूचित जाती महिला
8. बारडगाव गण- सर्वसाधारण
9. राशीन गण- सर्वसाधारण
10. भांबोरा गण- ओबीसी
गेल्यावेळी कर्जत तालुक्यात राष्ट्रवादीचे दोन व भाजपचे दोन जिल्हा परिषद सदस्य निवडून गेले होते. त्यापैकी भाजपच्या एका जिल्हा परिषद सदस्याचे निधन झाले. यंदा झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रसचनेत अंतराने लांब असलेली गावे व नियमित व्यवहार व संपर्क असलेली गावे दुसऱ्या गटात जोडली गेल्याने ही निवडणूक सोप्पी नसणार असल्याचे दिसत आहे. रातंजन हे मिरजगावला जवळ असलेले गाव चापडगाव गटात जोडण्यात आले आहे.
तर चिंचोली काळदात हे कोरेगावच्या जवळ असताना ते कुळधरण गटात जोडले गेले आहे. तालुक्यातील अनेक सोयीची गावे विस्तापित झाल्याने स्थानिक नेत्यांचे राजकारण बदलले आहे. शिवाय गेल्या पाच सहा महिन्यांत अनेक नेते रोहित पवारांना सोडून भाजपमध्ये दाखल झाल्याने तालुक्याचे राजकारण बदलले आहे. 2021 साली पंचायत समितीच्या सभापती आश्विनी कानगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये मनीषा जाधव या बिनविरोध सभापती झाल्या होत्या. गेल्यावेळी पंचायत समितीवर रोहित पवार यांचीच जादू दिसली.
कर्जत तालुक्यातील राजकारणाचा विचार केला तर, आ. रोहित पवार व सभापती राम शिंदे यांच्यातील वाद गेल्या सहा वर्षांपासून शिगेला पोहोचला आहे. राम शिंदे यांचा सलग दोन विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी, भाजपने त्यांच्यामागील ताकद वारंवार वाढवली आहे. त्यामुळे रोहित पवारांना आमदार असूनही संघर्ष करावा लागत आहे. यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही या तालुक्यात पुन्हा एकदा रोहित पवार विरुद्ध राम शिंदे हा संघर्ष रंगणार आहे.