Explained Pathardi Politics : पाथर्डी तालुका हा राजकारणाच्या बाबतीत सर्वात हाँट तालुका समजला जातो. शेवगाव- पाथर्डी तालुक्यातील सर्वच निवडणुका, या सारख्याच त्वेषाने लढविल्या जातात. पाथर्डी तालुक्याचा विचार केला तर येथे आ. मोनिका राजळे व प्रताप ढाकणे यांच्यात पारंपारिक लढत होते. लोकसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके हे खासदार झाल्यानंतर पाथर्डीचे राजकारण बदलेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु ती फोल ठरली.
आ. मोनिका राजळे यांनी विजयाची हॅट्र्रीक करत, ढाकणेंसह माजी आ. चंद्रशेखर घुले यांनाही आस्मान दाखवले. विधानसभेपूर्वी पाथर्डी बाजार समितीत निवडणुकीतही आ. राजळेंनी त्याच तालुक्याच्या बाँस आहेत, हे सिद्ध करुन दाखवले. त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ढाकणेंची जादू चालेल का? हे पहावे लागणार आहे. काय होईल पाथर्डी तालुक्यात? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

मतदार पुनर्रचनेत जिल्ह्यातील अनेक पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटात तोडफोड झाली. मात्र पाथर्डी तालुक्यातील गट व गण कायम राहिले. या तालुक्यातील काही गावे राहुरी मतदारसंघाला जोडली गेली असल्याने, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नेत्यांची चांगलीच तारेवरची कसरत होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या पाथर्डी बाजार समितीच्या निवडणुकीत आ. मोनिका राजळे गटाने 18 पैकी 17 जागा जिंकत आपली ताकद दाखवली होती.
आ. राजळे यांना त्यावेळी विद्यमान खा. डाँ. सुजय विखे व जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवाजी कर्डिले यांनी मदत केली होती. गेल्या 10-12 वर्षांपासून पाथर्डी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आ. राजळे यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. प्रत्येक निवडणुकीत स्वपक्षातून होणारा विरोध न जुमानता आ. राजळे यांनी तालुक्यातील सर्वच सत्तास्थानावर आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
पाथर्डी तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे 10 गण आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेत ते कायम राहिले. म्हणजेच यावेळीही जिल्हा परिषदेचे 5 व पंचायत समितीचे 10 सदस्य निवडणून दिले जाणार आहेत. पाथर्डी तालुक्यातील राजकारणाचा विचार केला तर येथे मराठा व वंजारी समाजाभोवतीच राजकारण फिरते.
स्थानिक स्वराज्य संस्थांची पदेही या दोन्ही समाजाला विभागून द्यावी लागतात, असा इतिहास आहे. त्यातच तालुक्यातील तिसगाव, मिरी, करंजीसह 39 गावे राहुरी मतदारसंघाला जोडलेली असल्याने, आ. राजळेंना या गावांच्या स्थानिक नेत्यांना सत्तेत वाटा देताना तारेवरची कसरत करावी लागते. यंदा होणाऱ्या निवडणुकीसाठी 2022 सालीच आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्या आरक्षणानुसार अनेक स्थानिक नेत्यांचे गट व गण शाबूत राहिले. आता कोणत्या गटात व गणात कसे आरक्षण राहिले ते आपण पाहू…
पाथर्डी पंचायत समिती गणातील आरक्षण
1. कासार पिंपळगाव गण (सर्वसाधारण महिला)
2. कोरडगाव गण (सर्वसाधारण महिला)
3. भालगाव गण (सर्वसाधारण)
4. अकोला गण (सर्वसाधारण महिला)
5. माळीबाभुळगाव गण (सर्वसाधारण)
6. तिसगाव गण (ओबीसी महिला)
7. मिरी गण (ओबीसी व्यक्ती)
8. करंजी गण (सर्वसाधारण)
9. माणिकदौंडी गण (सर्वसाधारण)
10. टाकळीमानुर गण (अनुसूचित जाती महिला)
आता या आरक्षणावरुन अनेक नेत्यांचे गट शाबूत राहिल्याचे दिसते. परंतु पंचायत समितीच्या माजी सभापती चंद्रकला खेडकर यांचा टाकळीमानूर गण मात्र अनुसूचित महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. तिसगाव गण महिलेसाठी राखीव झाल्याने तेथील सदस्य सुनील परदेशी यांचीही अडचण झाली आहे. मिरी गणातून राहुल गवळी, माणिगदौंडी गणातून सुनील ओव्हळ, माळीबाभुळगाव गणातून रवींद्र वायकर, करंजी गणातून एकनाथ आटकर, कोरडगाव गणातून सुनीता गोकूळ दौंड हे पुन्हा एकदा रिंगणात उतरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हा परिषद गटाचे आरक्षण पाहूयात…
1. कासार पिंपळगाव गट (सर्वसाधारण महिला)
2. भालगाव गट (सर्वसाधारण)
3. माळी बाभुळगाव गट (सर्वसाधारण)
4. मिरी गट (सर्वसाधारण)
5. टाकळीमानूर गट (सर्वसाधारण)
आता हे आरक्षण पाहिले तर जिल्ह्यात सर्वात नशिबवान तालुका हा पाथर्डीच ठरल्याचे दिसत आहे. पंचायत समितीच्या माजी सभापती चंद्रकला खेडकर यांचा टाकळीमानूर गण आरक्षित असला तरी त्यांना जिल्हा परिषद गट मात्र सर्वसाधारण आहे. त्यामुळे त्यांना या गटातूनही निवडणूक लढवता येणार आहे. शिवाय याच गटातून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे, जिल्हा परिषद सदस्या ललिता शिरसाट, त्यांचे पति अर्जून शिससाट यांच्या भुमिकेकडेही लक्ष असणार आहे. कासार पिंपळगाव हा तालुक्यातील एकमेव गट महिलेसाठी आरक्षित आहे.
तेथे विद्यमान सरपंच मोनाली राजळे, राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सदस्य योगीता राजळे आदींच्या नावाच्या चर्चा आहेत. भालगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण आहे. तेथे विद्यमान सदस्य प्रभावती ढाकणे यांना राष्ट्रवादीकडून पुन्हा संधी मिळू शकते. भाजपकडून भालगावच्या सरपंच डाँ. मनोरमा खेडकर, भाजपचे गोकूळ दौंड यांच्या भुमिकेकडेही लक्ष राहिल.
मिरी करंजी गटातही यावेळी चांगलीच टशन रंगण्याची शक्यता आहे. या गटात सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. माजी सभापती संभाजी पालवे, अनोल वाघ, उषाताई कराळे, चारुदत्त वाघ, वैभव खलाटे, बाळासाहेब अकोलकर, संतोष शिंदे, अशी इच्छुकांची मोठी यादी येथे दिसू शकते. अशीच स्थिती तिसगाव गटातही पहायला मिळते. तिसगाव गटातून काशिनाथ पाटील लवांडे, संध्या आठरे, पुरुषोत्तम आठरे, मढीचे सरपंच संजय मरकड, कुशल भापसे यांची नावे इच्छुकांच्या यादीत घेतली जाऊ लागली आहेत.
पाथर्डी तालुक्यातील सर्व निवडणुका या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा दुरंगी होण्याची शक्यता आहे. परंतु अनेक ठिकाणी इच्छुक जास्त असल्याने या लढतील तिरंगी किंवा थेट चौरंगी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. तालुक्यात राष्ट्रवादी जिवंत ठेवण्यासाठी व गेल्या विधानसभेचा बदला घेण्यासाठी प्रताप ढाकणे यांनी तयारी सुरु केली आहे. तर पंचायत समिती पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी आ. मोनिका राजळे गटाच्या व्यूव्हरचना सुरु झाल्या आहेत.