ब्रेकिंग : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात उभारला जाणार ६ लेनचा नवा रिंगरोड !

Published on -

Expressway News : महाराष्ट्राच्या विकासात भर घालणारी बातमी समोर येत आहे. गेल्या काही वर्षात राज्यात विविध रस्ते विकासाची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये रिंग रोड सुद्धा उभारले जात आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहराला पण आता नव्या रिंग रोडची भेट मिळणार आहे. येथील औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.

शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज या प्रमुख औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या प्रस्तावित रिंग रोडसाठी राज्य शासनाने सर्वेक्षण आणि भूसंपादन प्रक्रियेला हिरवा कंदील दिला आहे.

सुमारे ६७ किलोमीटर लांबीचा हा ६ पदरी ग्रीनफील्ड रस्ता असल्याने शहरातील तसेच औद्योगिक वाहतुकीच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

हा रिंग रोड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाकडे प्रस्तावित करण्यात आला होता. शासनाने त्यावर तातडीने सहमती दर्शवत सर्वेक्षण व भूसंपादनास मंजुरी दिली आहे.

सध्या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीच्या निवडीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याची फाइल मंजुरीसाठी सादर करण्यात आली असून, लवकरच प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. भगत यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा आणि बिडकीन हे ऑरिक सिटीअंतर्गत, तर वाळूज, चिकलठाणा व परिसरातील इतर भाग एमआयडीसीअंतर्गत विकसित औद्योगिक केंद्रे आहेत.

विशेषतः बिडकीन परिसरात सरकारने सुमारे ८ हजार एकर जमीन संपादित केली असून, येथे मोठ्या उद्योगांची गुंतवणूक वाढत आहे. एथर एनर्जी, टोयोटा किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी आणि लुब्रीझोलसारख्या नामांकित कंपन्यांनी येथे गुंतवणुकीची घोषणा केली असून, सुमारे १,२६१ कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

करमाड-एकोडापासून सुरू होणारा आणि पाचोड मार्गे थेट ढोरेगावपर्यंत जाणारा हा रिंग रोड अवजड वाहतूक थेट शहराबाहेरून वळवण्यास मदत करणार आहे.

यामुळे शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ६० मीटर रुंद जमीन संपादित केली जाणार असून, करमाड-बिडकीन मार्गासाठी ३१५ कोटी रुपये आणि बिडकीन-ढोरेगाव मार्गासाठी ४३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

हा रिंग रोड कार्यान्वित झाल्यास औद्योगिक दळणवळण वेगवान होऊन छत्रपती संभाजीनगरचा सर्वांगीण विकास अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe