शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! म्हैस खरेदीसाठी मिळणार 42 हजार रुपये, कोणाला मिळणार लाभ ?

Farmer Scheme : महाराष्ट्रात फार पूर्वीपासून पशुपालनाचा व्यवसाय केला जातोय. देशात हरितक्रांतीनंतर श्वेत क्रांती झाली अन तेव्हापासून खऱ्या अर्थाने देशात दुग्धोत्पादनाला चालना मिळाली आहे. महाराष्ट्रात देखील दूध उत्पादनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या व्यवसायावर अवलंबित्व आहे.

छोटे शेतकरी शेती सोबतच पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहेत. या व्यवसायामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यात पशुपालन व्यवसायाचा मोठा सिंहाचा वाटा राहिला आहे.

पशुपालनाचा व्यवसाय हा प्रामुख्याने दुधासाठी केला जातो. गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात मात्र मोठी तफावत असते. त्यामुळे अलीकडे शेतकऱ्यांनी म्हशीच्या पालनाला अधिक पसंती दाखवली आहे. म्हैस पालन करण्यासाठी शेतकरी बांधव जातीवंत म्हशींची खरेदी करत असतात.

मात्र असे करत असताना शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची देखील शक्यता असते. शिवाय म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्यांना हजारो लाखो रुपयांचे भांडवल लागते. दरम्यान म्हैस खरेदी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वारणा दूध संघाने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे.

वारणा दूध संघाने जातीवंत म्हशीची पैदास होण्यासाठी मेहसाना व मुऱ्हा म्हशी वारणा दूध संघामार्फत खरेदी करून संघाच्या कार्यस्थळावर विक्रीचे केंद्र निर्माण करण्याचा मोठा निर्णय नुकताच घेतला आहे. या निर्णयाचा शेकडो पशुपालकांना फायदा होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे दूध संघाच्या या विक्री केंद्रातून जे पशुपालक शेतकरी म्हैस खरेदी करतील त्यांना 42,000 चे अनुदान सुद्धा दूध संघाच्या माध्यमातून दिले जाईल अशी घोषणा दुध संघाने केली असून याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच केंद्र राहील असा दावा देखील आमदार महोदयांनी केला आहे.

तसेच दूध संघास 59 कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या ५६ व्या वार्षिक सभेत बोलताना आमदार कोरे यांनी ही मोठी घोषणा केली आहे.