Farmer Success Story : अलीकडे राज्यात शेती व्यवसायात मोठा बदल पाहायला मिळत आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या आणि प्रयोगाच्या जोरावर शेतकरी बांधव आता शेती व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहेत. विदर्भातील शेतकरी देखील आता वेगवेगळे प्रयोग करत आहेत. दरम्यान वर्धा जिल्ह्यातील एका शेतकरी दांपत्याने देखील स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग केला आहे.
वास्तविक स्ट्रॉबेरी हे थंड हवामानातील पीक आहे. याची शेती आपल्या महाराष्ट्रात महाबळेश्वर व आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळते. मात्र या शेतकरी दांपत्याने चक्क वर्धा सारख्या उष्ण हवामानात स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली असल्याने सध्या या शेतकरी दांपत्याची चांगलीचं चर्चा रंगत आहे.
जिल्ह्यातील मौजे कात्री येथील महेश पाटील व त्यांच्या धर्मपत्नी भारती पाटील यांनी ही किमया साधली आहे. महेश व भारती पाटील यांनी शेतीमध्ये केलेला हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने याची दखल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी देखील घेतली आणि प्रत्यक्ष त्यांच्या शेताला भेट दिली. वर्धा जिल्हा म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर उभे राहत ते कापसाचे चित्र. त्यातच हिंगणघाट तालुका हा कापूस उत्पादनासाठी संपूर्ण राज्यात नावाजलेला तालुका आहे.
हेच कारण आहे की कापसावर प्रक्रिया करणारे उद्योग देखील तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. तालुक्यातील कात्री या गावात देखील कापसाची शेतीचं प्रामुख्याने केली जाते. याच गावात महेश पाटील यांनी स्ट्रॉबेरी शेतीचा प्रयोग केला आहे. महेश पाटील यांची एकूण 18 एकर शेती जमीन आहे. या शेतजमिनीत ते भाजीपाला आणि फळबाग पिकांची लागवड करतात. मिरची टोमॅटो वांगी या तरकारी पिकांची आणि सिताफळ पपई या फळ पिकांची शेती त्यांनी यशस्वी फुलवली आहे.
याशिवाय कापूस तूर हरभरा या पारंपारिक पिकांचीं देखील ते शेती करतात. मात्र पहिल्यांदाच त्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यावर्षी निर्णय घेतला. महाबळेश्वरला फिरायला गेले असताना त्यांना स्ट्रॉबेरी लागवडीची कल्पना सुचली आणि हा प्रयोग त्यांनी सत्यात उतरवला. स्ट्रॉबेरी ची शेती त्यांनी यशस्वी करून दाखवली असून 250 ग्रॅमचीं 900 बॉक्स स्ट्रॉबेरी विक्री त्यांनी आतापर्यंत केली आहे.
यावेळी केली स्ट्रॉबेरीची लागवड
या नवयुवक दांपत्याने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांनी आपल्या पाऊण एकर जमिनीत स्ट्रॉबेरीची लागवड केली. शेत जमिनीची मशागत करून मल्चिंग पेपर अंथरून एकूण दहा हजार रोपांची लागवड करण्यात आली. यानंतर पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर झाला. या पिकाला आता फळधारणा झाली असून प्रत्यक्ष उत्पादन त्यांना मिळत आहे. पिकाच्या वाढीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करण्यात आले आणि पोल्ट्री खत सारखे इतर सेंद्रिय खत देखील या ठिकाणी त्यांनी वापरले.
वास्तविक 30 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमान या पिकाला मानवत. त्यामुळे विदर्भात स्ट्रॉबेरी लागवडीचा विचार देखील करणे शक्य आहे. मात्र स्ट्रॉबेरी लागवड केल्यानंतर सुदैवाने विदर्भात यावर्षी आतापर्यंत कमी तापमान राहिल्याने त्यांना ही स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी करता आली आहे. आतापर्यंत त्यांना स्ट्रॉबेरी पिकासाठी दोन लाखाचा खर्च झाला आहे. अडीचशे ग्रॅमचे पॅकेट तयार करून सध्या स्ट्रॉबेरीची विक्री सुरू आहे.
या बॉक्सचे शंभर रुपये किंमत असून त्यांना यातून बऱ्यापैकी उत्पन्न मिळण्याची आशा आहे. शेतीमध्ये जरा हटके करण्याच्या अनुषंगाने केलेला हा भन्नाट प्रयोग सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. एकंदरीत आत्महत्येसाठी कुख्यात बनलेल्या विदर्भात साधलेला हा प्रयोग कौतुकास्पद असून आता विदर्भातील शेतकरी आर्थिक उन्नती साधण्यासाठी शेतीमध्ये वेगवेगळे मार्ग चोखंदळत असल्याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. विदर्भातील या शेतकरी दांपत्याने केलेला हा प्रयोग राज्यभरातील शेतकऱ्यांना वेगळी दिशा देणार हा दावा देखील यानिमित्ताने केला जात आहे.