FASTag Rule : देशभरातील कोट्यवधी वाहनचालकांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. FASTag वापराशी संबंधित Know Your Vehicle (KYV) ही अनिवार्य प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, हा नवा नियम १ फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणार आहे.
या बदलाचा थेट फायदा कार, जीप आणि व्हॅनसाठी जारी करण्यात येणाऱ्या FASTag धारकांना होणार आहे. आतापर्यंत FASTag अॅक्टिव्हेशनसाठी KYV ही प्रक्रिया बंधनकारक होती. यामध्ये वाहनाची नोंदणी माहिती, वाहनाचा प्रकार, नंबर प्लेट आणि इतर तपशीलांची पडताळणी केली जात होती.

मात्र अनेक वेळा तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन असणे किंवा डेटाबेस अपडेट न होणे यामुळे ही प्रक्रिया वेळखाऊ ठरत होती. परिणामी FASTag उशिरा अॅक्टिव्ह होत असे आणि वाहनचालकांना टोल प्लाझावर अडचणींचा सामना करावा लागत होता.
NHAI ने या समस्यांचा विचार करून KYV प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमानुसार FASTag संदर्भातील वाहन माहितीची पडताळणी करण्याची संपूर्ण जबाबदारी आता थेट FASTag जारी करणाऱ्या बँकांकडे सोपवण्यात आली आहे.
बँका अधिकृत वाहन डेटाबेसच्या आधारे आवश्यक तपासणी करतील. त्यामुळे वाहनधारकांना पुन्हा-पुन्हा व्हेरिफिकेशनसाठी कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही.
या निर्णयामुळे FASTag खरेदी केल्यानंतर तो त्वरित अॅक्टिव्ह होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. वाहनचालकांचा वेळ वाचणार असून, टोल प्लाझावर होणारा गोंधळ आणि विलंब कमी होण्याची शक्यता आहे.
तसेच FASTag अॅक्टिव्ह नसल्यामुळे होणारे वाद, दंडात्मक शुल्क आणि गैरसमज यांनाही आळा बसणार आहे. विशेष म्हणजे, बँकांच्या शाखा किंवा कस्टमर केअर सेंटरच्या वारंवार फेऱ्या मारण्याचा त्रासही आता कमी होणार आहे.
एकूणच, FASTag प्रणाली अधिक सोपी, जलद आणि वापरकर्त्यांसाठी सुलभ बनवण्याच्या दिशेने NHAI चा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. वाहनचालकांसाठी हा बदल निश्चितच प्रवास अधिक सुरळीत करणारा ठरणार आहे.













