FD News : तुम्हीही एफडी अर्थात फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणार आहात का? अहो मग तुमच्यासाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर एफडी हा सुरक्षित गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये जेष्ठ नागरिक आणि महिला गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात.
मात्र 7 फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर फिक्स डिपॉझिट वरील व्याजदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. आरबीआय ने पाच वर्षानंतर पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये कपात केली आहे.

आधी रेपो रेट 6.50% इतका होता मात्र 7 फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या नव्या निर्णयानुसार हा दर 6.25% पर्यंत कमी करण्यात आला आहे. यामुळे होम लोन कार लोनचे विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात कपात होऊ लागली आहे तर दुसरीकडे सेविंग बँक अकाउंट मध्ये जमा रकमेवरील व्याजदरात आणि एफडी वरील व्याजदरात देखील बँकांकडून कपात केली जात आहे.
दरम्यान फेब्रुवारी महिन्यात देशातील काही बँकांनी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे. अशा परिस्थितीत आज आपण फेब्रुवारीमध्ये देशातील कोणत्या बँकांनी एफडीच्या व्याजदरात बदल केला आहे याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कर्नाटक बँक : कर्नाटक बँकेने आपल्या एफ डी व्याज दरात बदल केला आहे. नव्या बदलानुसार या बँकेकडून सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 3.50% ते 7.50% दराने परतावा दिला जात आहे.
महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 3.75 टक्यांपासून ते आठ टक्के दराने परतावा दिला जात आहे. ही बँक 401 दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक म्हणजेच 7.50% दराने परतावा देत आहे, याच कालावधीच्या एफडीवर जेष्ठ नागरिक ग्राहकांना आठ टक्के दराने परतावा मिळतोय.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक : ही बँक आपल्या ग्राहकांना 18 महिने कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देते. मिळालेल्या माहितीनुसार उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून 18 महिने कालावधीच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 8.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 8.75 टक्के दराने रिटर्न दिले जात आहेत.
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक : सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना पाच वर्षांच्या कालावधीवर सर्वाधिक 8.50% दराने व्याज देत आहे. महत्त्वाचे म्हणजे याच कालावधीच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 0.50% अतिरिक्त व्याज मिळते, म्हणजेच या कालावधीच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 9.10% दराने व्याज दिले जात आहे.
शिवालिक स्मॉल फायनान्स बँक : ही बँक 12 महिने एक दिवस ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ग्राहकांना सर्वाधिक व्याज देते. या कालावधीच्या एफडीवर बँकेकडून सामान्य ग्राहकांना 8.55 टक्क्याने आणि ज्येष्ठ नागरिकांना 9.05% दराने परतावा दिला जात आहे.