Gharkul Yojana :- शिंदे-फडणवीस सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने शिंदे सरकारने राज्यातील विविध घटकातील नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये समाजातील शोषित आणि वंचित घटकांना उभारी देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. अशातच राज्यातील एका विशिष्ट प्रवर्गातील नागरिकांसाठी एक नवीन घरकुल योजना देखील राज्य शासनाने जाहीर केली आहे.
वास्तविक, महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यातील वेगवेगळ्या समाजातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या घरकुल योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, यशवंतराव मुक्त वसाहत योजना यांसारख्या विविध योजनांचा समावेश होतो. या सर्व योजनेच्या माध्यमातून राज्यातील विविध समाजातील नागरिकांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहेत.
मात्र राज्यात वेगवेगळ्या समाजासाठी घरकुलाच्या योजना सुरू असल्या तरी देखील ओबीसी समाजातील नागरिकांसाठी अद्याप घरकुलाची योजना सुरू नव्हती. अशा परिस्थितीत ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी देखील स्पेशल घरकुल योजना असावी अशी मागणी होती. यासाठी शासनाकडे गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. मात्र या पाठपुराव्याला यश आले ते शिंदे सरकारच्या काळात.
शिंदे सरकारने राज्यातील ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना घरकुल उपलब्ध व्हावे यासाठी मोदी आवास योजना ही महत्त्वाकांक्षी योजना नुकतीच सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मोदी आवास योजनेअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील नागरिकांना पहिल्या टप्प्यात तीन लाख घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच या योजनेच्या माध्यमातून 2025-26 पर्यंत एकूण 10 लाख घरे बांधून मिळणार आहेत. या दहा लाख घरांसाठी जवळपास 12 हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.
किती अनुदान मिळणार ?
हाती आलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी पीएम किसान योजनेप्रमाणेच नियम आणि निकष राहणार आहेत. तसेच पीएम आवास योजनेअंतर्गत जेवढे अनुदान मिळते तेवढेच अनुदान या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. म्हणजेच एक लाख वीस हजार रुपये एवढे अनुदान लाभार्थ्याला मिळणार आहे.
योजनेच्या लाभासाठी पात्रता?
या योजनेचा लाभ हा ओबीसी समाजातील नागरिकांना दिला जाणार आहे. किमान 15 वर्ष महाराष्ट्राचा रहिवासी असलेल्या नागरिकांनाच या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा कमी आहे अशाच कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या कुटुंबाकडे स्वतःचे हक्काचे घर नाही अशाच कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या व्यक्तींकडे शासनाची किंवा स्वतःची जमीन नाही अशाच लोकांना याचा लाभ मिळेल. यापूर्वी कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर अशा लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे?
या योजनेच्या लाभासाठी पीएम आवास योजनेसाठी ज्याप्रमाणे कागदपत्रे लागतात तेवढीच कागदपत्रे लागणार आहेत. मात्र ओबीसी समाजासाठी ही योजना असल्याने यासाठी जातीचा दाखला अनिवार्य राहणार आहे. तसेच सातबारा उतारा, मालमत्ता नोंदपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड किंवा मतदान ओळखपत्र, लाईटबिल किंवा मनरेगाचे जॉबकार्ड व बचत खात्याची बॅंक पासबूक झेरॉक्स यांसारखे अन्य काही महत्त्वाची कागदपत्रे देखील अर्जदाराला सादर करावी लागणार आहेत.
अर्ज कुठे करावा लागणार?
ही योजना आत्ताच जाहीर झाली आहे. या योजनेसाठी अद्याप संकेतस्थळ सुद्धा तयार करण्यात आलेले नाही. यामुळे या योजनेसाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. या योजनेचा जेव्हा जीआर जारी होईल आणि या योजनेसाठीचे स्पेशल संकेतस्थळ विकसित होईल तेव्हाच या योजनेसाठी अर्ज करता येईल अशी माहिती संबंधितांनी यावेळी दिली आहे.