Gold Storage:- चीन हा जगातील सर्वाधिक सोन्याचे उत्पादन करणारा देश असून जागतिक सोन्याच्या उत्पादनात त्याचा वाटा लक्षणीय आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार 2023 मध्ये जगातील एकूण उत्पादनापैकी 10 टक्के सोनं चीनमधील खाणींमधून उत्खनन करण्यात आलं होतं. नुकतेच चीनमध्ये तब्बल 12 लाख किलो सोन्याचा साठा शोधण्यात आला असून त्याच्या विक्रीमुळे देशाच्या आर्थिक स्थितीत मोठा बदल घडू शकतो.
नोव्हेंबर 2024 मध्ये मध्य चीनच्या हुआन प्रांतात 7 लाख 25 हजार 731 कोटी रुपये किमतीचा सोन्याचा मोठा साठा आढळून आला होता. यानंतर अवघ्या दोन महिन्यांत जानेवारी 2025 मध्ये चीनमध्ये आणखी एक मोठा सोन्याचा साठा सापडल्याची माहिती समोर आली आहे.
![gold mine](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/og.jpg)
या वेळी गान्सू, मंगोलियाचा अंतर्गत भाग आणि हायलाँगजीआंग या प्रांतांमध्ये 1 लाख 68 हजार किलो सोनं सापडल्याचे अधिकृत अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. या शोधामुळे चीनच्या सोन्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून जागतिक सोन्याच्या किंमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
सर्वाधिक सोन्याचा साठा सापडण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर
या ऐतिहासिक शोधांपूर्वी जगात सर्वाधिक सोन्याचा साठा सापडण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता. नोव्हेंबर 2024 मध्ये चीनमध्ये 1 हजार मेट्रिक टन म्हणजेच 10 लाख किलो नैसर्गिक सोनं पीनजीयांग प्रांतात सापडलं होतं.
ज्याची अंदाजे किंमत 6,91,473 कोटी रुपये होती. हा जागतिक पातळीवरील सर्वात मोठा सोन्याचा साठा मानला जातो. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या साऊथ डीप माईन येथे 9 लाख 30 हजार किलो सोनं आढळून आलं होतं.परंतु चीनच्या नव्या शोधांमुळे हा विक्रम मोडला गेला आहे.
चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या विस्तृत सर्वेक्षणांनुसार, जमिनीखाली दोन किलोमीटर खोलीवर 3 लाख किलो सोन्याचा अजून मोठा साठा असल्याचे संकेत मिळाले आहेत. नवीन थ्री-डी भूगर्भीय तंत्रज्ञानाच्या मदतीने हे उत्खनन करण्यात येत असून संशोधकांना जमिनीच्या तीन किलोमीटर खोलीपर्यंत सोनं असल्याचा अंदाज आहे.
हे तंत्रज्ञान अत्याधुनिक असल्यामुळे, पूर्वीच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा अधिक अचूक आणि वेगवान उत्खनन करता येत आहे. त्यामुळे भविष्यात चीनला आणखी मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे सापडण्याची शक्यता आहे.
जगातील सर्वाधिक सोन्याचे साठे असलेले देश
फोर्ब्सच्या अहवालानुसार सर्वाधिक सोन्याचे साठे असलेल्या देशांमध्ये अमेरिका, जर्मनी आणि इटली हे तीन देश अग्रस्थानी आहेत. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या माहितीनुसार, अमेरिकेकडे सर्वाधिक म्हणजे 81 लाख 33 हजार किलो सोन्याचा साठा असून हा साठा दुसऱ्या,
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील देशांच्या एकत्रित साठ्याहून अधिक आहे. या यादीत फ्रान्स चौथ्या स्थानावर असून चीन सहाव्या क्रमांकावर आहे. चीनकडे सध्या 22 लाख 64 हजार किलो सोनं असून भारताकडे 8 लाख 40 हजार किलो सोन्याचा साठा आहे.
चीनला कसा होईल फायदा?
या नव्या शोधांमुळे चीनच्या जागतिक आर्थिक वर्चस्वात मोठी वाढ होऊ शकते. सोन्याचा साठा अधिक झाल्याने देशाच्या चलनाच्या स्थैर्यावर आणि परकीय गंगाजळीच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होईल.
तसेच जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतींवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. जर चीन मोठ्या प्रमाणावर सोन्याची विक्री करण्यास सुरुवात करत असेल तर जागतिक सोन्याच्या किमती घसरू शकतात. यामुळे सोन्याची गुंतवणूक करणाऱ्या देशांसाठी आणि व्यापारासाठी ही एक महत्त्वाची घडामोड ठरणार आहे.