Gold Price : सोने खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? तर मग आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. विशेषतः सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची ही बातमी विशेष फायद्याची राहणार आहे. कारण की सोन्याच्या किमती बाबत एक नवीन अपडेट हाती येत आहे. आगामी काळात सोन्याचे किमती अशाच वाढत राहणार की यात काही घट होणार याचसंदर्भात तज्ञांकडून महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
खरेतर, सोन्याच्या किमती सध्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून, त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. ज्यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी सोन्यामध्ये गुंतवणूक केली होती त्यांना यातून चांगला लाभ झाला आहे. मात्र, सध्या संपूर्ण देशात लग्नाचा सिझन सुरू आहे. यामुळे खाजगी वापरासाठी सोने खरेदी करणाऱ्यांना वाढत्या किमतीचा फटका बसतोय.

लग्नसराई किंवा खासगी वापरासाठी दागिने खरेदी करणाऱ्यांना सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. तथापि, ग्राहकांना पुढील काही वर्षांत मोठा दिलासा मिळू शकतो. कारण की आता सोन्याच्या किमतींमध्ये 38% पर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर 89,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. जर यात 38% घट झाली, तर हा दर 55,496 रुपये प्रति 10 ग्रॅमवर येऊ शकतो.
अमेरिकन फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी मॉर्निंगस्टारच्या विश्लेषक जॉन मिल्स यांच्या मते, सोन्याची किंमत प्रति औंस 1,820 डॉलर पर्यंत खाली जाऊ शकते, जे सध्याच्या पातळीच्या तुलनेत जवळपास 38% कमी असेल. गेल्या 12 महिन्यांतील वाढ पूर्णपणे नष्ट होऊ शकते. म्हणजेच गेल्या बारा महिन्यांपूर्वीचा सोन्याचा दर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळू शकतो. असे झाल्यास सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे पण नव्याने सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी देखील राहणार आहे.
सोन्याच्या किमती वाढण्याचे कारण
सोन्याचे दर का कमी होऊ शकतात हे जाणून घेण्याआधी आपण सोन्याच्या किमती का वाढल्या आहेत हे समजून घेऊयात. सध्या सोन्याचा दर 3,080 डॉलर प्रति औंसवर पोहोचला असून, त्यामागे अनेक कारणे आहेत. भू-राजकीय तणाव, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता आणि वाढती महागाई यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे मोठ्या प्रमाणावर कल वाढवला आहे.
विशेषतः, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार युद्धाच्या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली असून, त्यामुळे सोन्याच्या किमतींना बळ मिळाले आहे. सोन्याचा पुरवठा झपाट्याने वाढत आहे, हे एक महत्त्वाचे कारण आहे. सोन्याच्या वाढत्या किमती पाहता खाणकामात वाढ झाली असून, अनेक देश मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढवत आहेत.
2024 च्या दुसऱ्या तिमाहीत सोन्याच्या खाणकामातून मिळणारा नफा 950 डॉलर प्रति औंस एवढा होता, जो 2012 नंतर सर्वाधिक आहे. 2024 मध्ये जागतिक सोन्याचा साठा 9% वाढून 2,16,265 टन झाला आहे. ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाढवले असून, जुने सोनेही मोठ्या प्रमाणावर पुनर्वापरात आणले जात आहे.
याशिवाय, मागणी कमी होण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक सेंट्रल बँका आणि गुंतवणूकदार गेल्या काही तिमाहींपासून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत, मात्र ही मागणी कायम राहील की नाही, याची हमी नाही. 2024 मध्ये सेंट्रल बँकांनी 1,045 टन सोने खरेदी केले, ही सलग तिसरी वेळ आहे की खरेदी 1,000 टनच्या वर गेली.
सोन्याच्या किमती कमी का होणार?
वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या सर्वेनुसार, 71% सेंट्रल बँका पुढील वर्षी सोन्याची खरेदी कमी करू शकतात किंवा सध्याच्या पातळीवर ठेवू शकतात. इतिहास पाहता, जेव्हा एखाद्या क्षेत्रात विलीनीकरण आणि अधिग्रहण (M&A) मोठ्या प्रमाणावर होऊ लागते, तेव्हा तो त्या क्षेत्राच्या किंमतींच्या उच्चांकाचा सूचक असतो. 2024 मध्ये सोन्याच्या उद्योगातील व्यवहार 32% वाढले असून, त्यामुळे हा बाजार सर्वोच्च शिखरावर पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत.
तसेच, सोन्याशी संबंधित नवे गुंतवणूक निधी (ETF) वाढले आहेत, जे यापूर्वीही किंमत घसरण्याच्या आधी पाहायला मिळाले होते. जॉन मिल्स यांचा अंदाज असेल की सोन्याच्या किमती 38% घसरेल, मात्र अनेक मोठ्या विश्लेषकांचे मत वेगळे आहे. वॉल स्ट्रीटवरील अनेक अर्थतज्ज्ञ अजूनही सोन्याच्या किमती वाढतील, असे मानत आहेत. बँक ऑफ अमेरिकाचा अंदाज आहे की पुढील दोन वर्षांत सोन्याचा दर 3,500 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतो, तर गोल्डमन सॅक्सच्या मते 2025 च्या अखेरीस हा दर 3,300 डॉलर प्रति औंस होईल.
त्यामुळे भविष्यात सोन्याच्या किमती वाढतील की घसरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. नक्कीच सोन्याच्या किमतीत घसरण झाली तर सोन्या मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना याचा मोठा फटका बसणार आहे तर दुसरीकडे नव्याने सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे. मात्र असे असले तरी सोन्याच्या किमतीत खरंच आगामी काळात घसरण होणार का हे पाहण विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.