सोने की रिअल इस्टेट…….गुंतवणूकदारांना कुठून मिळणार सर्वाधिक रिटर्न ? जाणकारांचा सल्ला पहा….

Gold Vs Real Estate : अलीकडे गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड, पोस्टाच्या बचत योजना बँकांच्या एफ डी योजना असे असंख्य पर्याय गुंतवणूकदारांपुढे उपलब्ध आहेत.

यासोबतच सोने-चांदीसारख्या मौल्यवान धातूंमध्ये देखील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात केले जाते. तसेच काही लोक रिअल इस्टेट मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवताना दिसतात.

जमीन, प्लॉट, फ्लॅट, घर अशा मालमत्तांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठी वाढली आहे. सोने आणि रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या काही वर्षांमध्ये चांगला परतावा सुद्धा मिळाला आहे.

पण सोने आणि रिअल इस्टेट यापैकी कोणत्या गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना चांगला फायदा मिळतो? गुंतवणुकीचा कोणता पर्याय गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरतो? याबाबत तज्ञांनी काय सल्ला दिला आहे याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. 

रिअल इस्टेट मधील गुंतवणुकीचे फायदे : लॉंग टर्म साठी गुंतवणूक करायची असल्यास रिअल इस्टेट फायद्याचे ठरते. गेल्या काही वर्षांत रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला नफा मिळाला आहे. रिअल इस्टेट मधील मालमत्ता भाड्याने देता येते. म्हणजेच यामुळे तुम्हाला नियमित उत्पन्न मिळु शकते.

सुरुवातीला तुम्हाला प्रॉपर्टी खरेदीसाठी कर्ज काढावे लागू शकते. विशेष म्हणजे कर्ज परतफेडीसाठी तुम्हाला भाड्यातुन मिळणारे उत्पन्न वापरता येणार आहे. प्रॉपर्टी साठी घेतलेले कर्ज फिटल्यानंतर संपूर्ण प्रॉपर्टी तुमची होणार आहे. कर्ज फिटले की त्या प्रॉपर्टीचे मिळणारे भाडे तुमचे उत्पन्न वाढवत राहणार आहे.

कालांतराने तुम्ही भाडे वाढवू शकता. यामुळे उत्पन्नात आणखी वाढ होणार आहे. शिवाय प्रॉपर्टीचे भाव दिवसेंदिवस वाढतच राहणार आहेत. विशेष बाब अशी की पुढील आठ-दहा वर्षात घरांची वाढणारी मागणी पाहता या क्षेत्रात मोठी तेजी येण्याची शक्यता आहे.

यामुळे लॉन्ग टर्म साठी गुंतवणूक करायची असल्यास रिअल इस्टेट फायद्याचे ठरणार आहे. दीर्घकाळात मोठा नफा मिळवायचा असेल आणि नियमित उत्पन्न हवे असेल तर रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे राहणार आहे.

सोन्यात गुंतवणूकीचे फायदे : गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक अनिश्चितता आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून केली जाणारी विक्रमी सोन्याची खरेदी यामुळे याचे रेट प्रचंड वाढले आहेत. हेच कारण आहे की सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांना गेल्या काही वर्षांमध्ये चांगला परतावा मिळाला आहे.

सोन्यात गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे सहज खरेदी विक्री करता येते. जास्त वेळ न घालवता आणि विना अडचण सोने रोखीत बदलता येते. शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्यानंतर तसेच आर्थिक अनिश्चिततेची परिस्थिती तयार झाल्यानंतर सोने फायद्याचे ठरते.

भौतिक सोन्यासोबतच डिजिटल गोल्डमध्ये सुद्धा गुंतवणूक करता येणे शक्य आहे. अचानक पैशांची गरज भासली की तुम्ही तुमच्या घरातील सोने विकून तुमची गरज भागवू शकता. अर्थातच लिक्विडिटी (तत्काळ रोख) आणि आर्थिक सुरक्षीतता हवी असेल तर सोन्यात गुंतवणूक करणे तुमच्यासाठी अधिक फायद्याचे ठरणार आहे.