Government Employee News : राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्यांसाठी अधिक खास राहणार आहे. दिनांक एक नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच, मान्यता प्राप्त खाजगी 100% अनुदानित प्राथमिक, माध्यमिक,
उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील 100% अनुदानित पदावरील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी जे NPS म्हणजेच नवीन पेन्शन योजनेअंतर्गत येतात त्यांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान, रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे.

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान लागू करण्यात आले आहे. रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आली आहे.
त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तिवेतनधारकास व रुग्णता निवृत्तिवेतनधारकास महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, 1982 मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतन किंवा रुग्णता निवृत्तिवेतन लागू होईल.
तसेच 100% अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे. राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचाऱ्यांना सदर निर्णय योग्य त्या फेरबदलासह लागू राहील.
मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबत सूचना सदर शासन निर्णयान्वये वित्त विभागाकडून करण्यात आली आहे.
या सूचनेस अनुलक्षून आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाव्दारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व NPS योजनेचा सदस्य असणारा कर्मचारी सेवेत असतांना मृत्यु पावल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्त उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करणेबाबतचा शासन निर्णय दिनांक 25 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
दरम्यान, वित्त विभागाच्या परिपत्रकामध्ये हा लाभ अनुज्ञेय करण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे. त्याच कार्यपद्धतीद्वारे आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाव्दारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
या अनुषंगाने आता महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार, NPS अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने सविस्तर कार्यपध्दती वित्त विभागाच्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहे.
आता सदर कार्यपद्धतीद्वारे आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाव्दारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे.
याअनुषंगाने वित्त विभागाकडून देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील. सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांनी उचित कार्यवाही करावी असे सुद्धा जीआर मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.













