Government Employee News : महाराष्ट्रातील सरकारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर सध्या राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. स्थानिकच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली असून येत्या दोन डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी येत्या दोन तारखेला मतदान होणार आहे. दरम्यान याच मतदानाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन डिसेंबर रोजी मतदानाच्या प्रक्रियेसाठी राज्यातील सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी मंजूर करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. महत्वाची बाब म्हणजे याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाकडून याबाबतचा सविस्तर जीआर जारी झाला आहे. दरम्यान आता आपण सदर शासन निर्णय सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जीआर काय सांगतो?
शासन आदेशानुसार, राज्य निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दोन डिसेंबर रोजी नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे.
दरम्यान येत्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा यासाठी निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना, मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.
सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहणार आहे. म्हणजे खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी, हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इ. ठिकाणी काम करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्यांना सुद्धा सुट्टी दिली जाणार आहे.
पण काही अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान होईल अशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थपनांच्या संदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचारी व कामगार इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची विशेष सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल असे पण या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
महत्वाची बाब म्हणजे शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी / व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी.
मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित आस्थापनांविरुध्द कारवाई करण्यात येईल असे सुद्धा या जीआर मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
अर्थात निवडणुक होणा-या मतदान क्षेत्रात मतदान असलेले कामगार / अधिकारी / कर्मचाऱ्यांना मग ते कामाच्या निमित्ताने निवडणूक होणाऱ्या मतदानसंघाबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी म्हणजेच भरपगारी सुट्टी मिळणार आहे.













