…….तर सरकारी कर्मचाऱ्यांना पात्र असतांनाही सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नाही ! शासनाचे नियम काय सांगतात ?

Government Employee News : शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते. मात्र पेन्शनचा लाभ घ्यायचा असल्यास काही गोष्टींचे पूर्तता करावी लागते. खरंतर योग्य आणि पात्र व्यक्तींना पेन्शन मिळावी यासाठी शासनाकडून काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या अंतर्गत दरवर्षी पेन्शन धारकांना नोव्हेंबर महिन्यात हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. एक नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पेन्शन धारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते.

महत्वाची बाब म्हणजे जे पेन्शन धारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ ठरतात त्यांची पेन्शन थांबवली जाते. लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सादर केले नाही तर संबंधित पेन्शन धारकांची पेन्शन तात्पुरती स्थगित करण्याचा सरकारचा नियम आहे.

यामुळे जर तुम्हीही पेन्शन धारक असाल तर तुम्हाला या नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. पण ज्या पेन्शन धारकांचे वय 80 वर्षांपेक्षा अधिक असते अशा पेन्शन धारकांसाठी सरकारने 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या दोन महिन्यांचा काळात जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा दिलेली आहे.

अर्थात सुपर सीनियर सिटीजन पेन्शन धारकांसाठी शासनाने नियम थोडे शिथिल केलेले आहेत. अशा परिस्थितीत आता आपण जीवन प्रमाणपत्र नेमके कसे काढायचे ? जीवन प्रमाणपत्र कुठे सादर करावे लागणार? ही प्रोसेस घरबसल्या करता येणे शक्य आहे का? या सगळ्या गोष्टींची माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

घरबसल्या सादर करता येणार जीवन प्रमाणपत्र

शासनाने आता पेन्शन धारकांना दिलासा देत घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यासाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्यात आले आहे.

डिजिटल लाइफ सर्टिफिकेट पेन्शनधारकांना घरबसल्या तयार करता येते आणि आपोआप हे सर्टिफिकेट सरकारकडे सादरही केले जाते. दरम्यान जर तुम्हालाही घरबसल्या जीवन प्रमाणपत्र सादर करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला किंवा लॅपटॉपला फिंगरप्रिंट/आयरिस स्कॅनर जोडायचे आहे.

मग jeevanpramaan.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. यानंतर गेट सर्टिफिकेट पर्यायावर क्लिक करा. एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि पीपीओ म्हणजेच पेन्शन पेमेंट ऑर्डर क्रमांक टाकायचा आहे. मग बायोमेट्रिक स्कॅन करायचे आहे.

शेवटी पडताळणी केली जाईल आणि तुमचे डिजिटल सर्टिफिकेट तयार होणार आहे. विशेष म्हणजे सर्टिफिकेट रेडी झाले की ते आपोआप बँक किंवा पोस्ट ऑफिसकडे पाठवले जाईल. पेन्शन धारकांना उमंग एप्लीकेशन वरून सुद्धा जीवना प्रमाणपत्र काढता येते आणि सादर करता येते.

यासाठी सर्वप्रथम पेन्शन धारकांनी आपल्या मोबाईल मध्ये उमंग एप्लीकेशन डाउनलोड करायचे. प्ले स्टोअर वर हे ॲप्लिकेशन विनाशुल्क उपलब्ध आहे. एप्पलच्या एप्लीकेशन स्टोअरवर सुद्धा हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे. दरम्यान एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जीवन प्रमाण असे शोधायचे आहे.

मग जनरेट लाइफ सर्टिफिकेट यावर क्लिक करायचे आहे. यानंतर मग आधार क्रमांक आणि पीपीओ क्रमांक टाकायचा आहे. एवढेच झाले की बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल आणि मग तुमचे सर्टिफिकेट रेडी होणार आहे. विशेष म्हणजे सर्टिफिकेट तयार झाल्यानंतर ते आपोआप संबंधित बँकेकडे जमा होईल.