‘ही’ एक चूक महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पडणार महागात ! सरकारने दिलेत पगारवाढ थांबवण्याचे संकेत

महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून बुधवारी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Published on -

Government Employee : राज्यातील नियमबाह्य वर्तणूक करणाऱ्या काही सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यामुळे राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

खरंतर गेल्यावर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत.

मात्र ही योजना गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या गडबडीत जाहीर करण्यात आली आणि विधानसभा निवडणुकीत याचा फायदा व्हावा यासाठी तत्कालीन महायुती सरकारने ही योजना घाईगडबडीत लागू केली.

याचा परिणाम म्हणून अर्जदारांची काटेकोर पडताळणी झाली नाही आणि म्हणूनच अनेक महिला अपात्र असताना सुद्धा याचा लाभ घेऊ लागल्यात. पण आता वर्तमान फडणवीस सरकारने या योजनेची काटेकोर पडताळणी सुरू केली आहे आणि या योजनेसाठी ज्या महिला अपात्र आहेत त्यांना योजनेतून वगळले जात आहे.

मात्र ही पडताळणी करत असताना राज्य सरकारच्या असे निर्देशनास आले की राज्यातील 9000 हून अधिक राज्य शासकीय सेवेतील महिला कर्मचारी सुद्धा याचा लाभ घेत आहेत. दरम्यान आता याच पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर राज्य सरकारकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 

महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार कठोर कारवाई 

बुधवारी सामान्य प्रशासन विभागाने ज्या महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देत याबाबत संबंधित विभागांना निर्देश सुद्धा दिलेले आहेत.

खरे तर लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य लाभ घेणाऱ्या महिला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डेटा महिला व बालविकास विभागाकडून तयार करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील 9526 महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतला आहे.

म्हणून आता अशा महिला सरकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार यांनी राज्यातील सर्व विभागांच्या सचिवांची बैठक घेतली होती.

या बैठकीत लाडकी बहीण योजनेचा नियमबाह्य लाभ घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. अशा गैरप्रकारांवर जर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही तर भविष्यात इतर कर्मचारी सुद्धा अशा योजनांचा गैरफायदा घेऊ शकतात म्हणून हा निर्णय या बैठकीत एकमताने मंजूर झाला. 

संबंधितांची पगार वाढ थांबवली जाणार 

सामान्य प्रशासन विभागाने लाडकी बहिण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या खात्यात जमा झालेली योजनेची संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

एवढेच नाही तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा होणार आहे. याव्यतिरिक्त काही प्रकरणांमध्ये संबंधितांची पगारवाढ सुद्धा थांबवली जाऊ शकते. विशेष म्हणजे ही कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि यामुळे असा गैरप्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!