Government Job : आजच्या स्पर्धात्मक युगात सरकारी नोकरी मिळवणं ही अनेकांसाठी मोठीच कसरत बनली आहे. लाखो उमेदवार, मर्यादित जागा, परीक्षा–मुलाखतींचा ताण आणि वर्षानुवर्षांची प्रतीक्षा… या सगळ्यात “सेफ जॉब”चं स्वप्न अनेकांचं अपूर्णच राहतं.
मात्र आता केंद्र सरकारच्या पोस्ट विभागाकडून एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak – GDS) या पदांसाठी तब्बल २५ हजारांपेक्षा जास्त रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या भरतीची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड थेट दहावीच्या गुणांच्या आधारे होणार आहे.
त्यामुळे कमी शैक्षणिक पात्रता असूनही सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. केवळ दहावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. मात्र दहावीमध्ये गणित आणि भाषा हे विषय असणे अनिवार्य आहे.
पोस्ट विभागाकडून या भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं असून २० जानेवारी २०२६ पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ फेब्रुवारी २०२६ असून, ५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज शुल्क भरता येईल. जर अर्जात काही चूक झाली असेल, तर ८ ते १० फेब्रुवारीदरम्यान दुरुस्ती करण्याची संधीही देण्यात आली आहे.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून दहावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल. ही मेरिट लिस्ट २० फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील तरुणांसाठी ही भरती विशेषतः फायदेशीर ठरणार आहे. ग्रामीण डाक सेवक पदावर काम करताना नोकरीची स्थिरता, केंद्र सरकारची सेवा आणि भविष्यातील इतर लाभ मिळण्याची संधी मिळते.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या, विशेषतः दहावी पास उमेदवारांसाठी ही भरती म्हणजे एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळापत्रक नक्की फॉलो करून अंतिम तारखेपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.













