Gram Farming : खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. भात, सोयाबीन, कापूस अशा विविध पिकांची येत्या काही दिवसांनी हार्वेस्टिंग सुरू होणार आहे. राज्यात सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. भात अर्थातच धान पिकाची देखील पूर्व विदर्भात आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. याशिवाय इतरही अन्य पिकांची खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
आता या विविध पिकाची येत्या काही दिवसांत हार्वेस्टिंग केली जाणार आहे. खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण झाली की, रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. बहुतांशी शेतकरी बांधव खरिपातील पिकांची काढणी झाल्यानंतर रब्बी हंगामात गहू आणि हरभरा पिकाची पेरणी करतात.
दरम्यान जर तुम्हीही यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा लागवड करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. आज आपण हरभऱ्याच्या काही सुधारित जातींची माहिती जाणून घेणार आहोत.
कृषी तज्ञ सांगतात की, कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळवायचे असेल तर त्या पिकाच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक असते. या अनुषंगाने आज आपण हरभरा पिकाच्या काही सुधारित जातींची माहिती पाहणार आहोत.
हरभऱ्याच्या सुधारित जाती खालील प्रमाणे
दिग्विजय : महाराष्ट्रात पेरणी करण्यासाठी या जातीची शिफारस केली जाते. हा वाण जिरायती आणि बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये उत्पादित होऊ शकतो. जिरायती भागात लागवड केल्यास 90 ते 95 दिवसात आणि बागायती भागात लागवड केल्यास 105 ते 110 दिवसात या जातीचे पीक परिपक्व होते.
या जातीची आणखी एक मोठी विशेषता म्हणजे उशिरा पेरणी केली तरीही या जातीपासून बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकते. हरभऱ्याची पेरणी ही साधारणतः 20 ऑक्टोबर नंतर केली जाते. यां काळातील हवामान हरभरा पिकासाठी विशेष अनुकूल असते. या जातीपासून शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी 14 क्विंटल पासून ते 23 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळू शकते.
विशाल : हरभऱ्याची ही देखील एक सुधारित जात आहे. राज्यातील प्रमुख हरभरा उत्पादक पट्ट्यात याची लागवड पाहायला मिळते. या जातीचे पीक 110 ते 115 दिवसात परिपक्व होत असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे. जर शेतकऱ्यांनी या जातीची जिरायती भागात लागवड केली तर त्यांना 13 क्विंटलचे आणि बागायती भागात लागवड केली तर वीस क्विंटलचे सरासरी उत्पादन मिळू शकते.
कृपा : ही देखील हरभऱ्याची एक सुधारित जात आहे. या जातीचे पीक सरासरी 105 ते 110 दिवसात तयार होते. या जातीचा हरभरा पांढऱ्या रंगाचा असतो. दाणे खूपच टपोरे असतात. यातून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन मिळते आणि बाजारात याला चांगला दरही मिळतो. उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर हेक्टरी 18 क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जातीपासून मिळू शकते असा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.