Gram Farming : हरभरा हे एक प्रमुख कडधान्य पीक असून याची लागवड रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात होते. या पिकाची शेती राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुमच्या नजरेस पडेल. हरभरा पिकाची लागवड ही शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. या पारंपारिक पिकाची दरवर्षी आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती होते.
गेल्या वर्षी कमी पाऊस असताना देखील हरभऱ्याची लागवड विशेष उल्लेखनीय राहिली होती. यंदा तर मान्सून काळात चांगला पाऊस झाला आहे. परतीचा पाऊस देखील यंदा महाराष्ट्रात चांगला जोरदार बरसला आहे.

एवढेच काय तर मान्सूनोत्तर पावसाने देखील महाराष्ट्रात चांगलाचं धुमाकूळ घातला असून या पावसाचा देखील रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. यामुळे यंदा रब्बी हंगामात गहू आणि हरभरा लागवडीखालील क्षेत्र वाढणार असे म्हटले जात आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण हरभऱ्याच्या एका सुधारित जातीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण हरभऱ्याच्या अशा एका जातीची माहिती जाणून घेणार आहोत ज्यातुन शेतकऱ्यांना हेक्टरी 23 क्विंटल पर्यंतचे विक्रमी उत्पादन मिळवता येणे सहज शक्य आहे..
हे आहे हरभऱ्याचे सुधारित वाण
दिग्विजय : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये हा वाण फारच लोकप्रिय आहे. मराठवाडा आणि विदर्भातील प्रमुख हरभरा उत्पादक पट्ट्यात या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. ही जात जिरायती आणि बागायती अशा दोन्ही सिंचन परिस्थितीमध्ये लागवडीसाठी उपयुक्त आढळून आली आहे.
जर जिरायती भागात लागवड केली तर या जातीचे पीक अवघ्या 90 ते 95 दिवसात हार्वेस्टिंग साठी रेडी होते आणि या जातीपासून जिरायती भागातून 14 क्विंटल हेक्टरी एवढे उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. जर बागायती भागात याची लागवड केली तर 105 ते 110 दिवसात या जातीचे पीक तयार होते आणि साधारणता 23 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते.
या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे उशिरा पेरणीसाठी देखील या जातीची शिफारस करण्यात आली आहे. उशिरा पेरणी करूनही शेतकऱ्यांना या जातीपासून चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य आहे.
कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीची जर उशिरा पेरणी केली तर शेतकऱ्यांना हेक्टरी 21 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळते. जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य असणारा हा वाण मर रोगास देखील प्रतिकारक असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.
हा वाण आपल्या महाराष्ट्रासाठी प्रसारित असून राज्यातील अनेक भागांमध्ये याची लागवड होते. त्यामुळे जर तुम्हालाही यंदा हरभरा लागवड करायची असेल तर तुम्ही या जातीची निवड करून नक्कीच चांगले उत्पादन मिळवू शकणार आहात.