Greenfield Expressway : २०२६ हे वर्ष नाशिकसाठी दळणवळण सुविधांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत असून, २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यातील पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला जात आहे.
रिंगरोड प्रकल्प, नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे रुंदीकरण, रेल्वे स्थानकांची दुरुस्ती, उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग अशा अनेक कामांना गती मिळाली आहे. या सर्वांमध्ये नाशिककरांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे नाशिक-अक्कलकोट ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प.

३१ डिसेंबर २०२५ रोजी या महामार्गाला मंजुरी देण्यात आली असून, लोकसभेत २९ जानेवारी रोजी यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. ‘पंतप्रधान गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन’ अंतर्गत मंजूर झालेला हा महामार्ग नाशिक ते सोलापूर आणि पुढे अक्कलकोटला जोडणार आहे.
विशेष म्हणजे हा मार्ग सोलापूरच्या पुढे आंध्र प्रदेशपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असून, त्यामुळे नाशिकहून दक्षिण भारताकडे जाणारा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
३७४ किलोमीटर लांबीच्या या सहा पदरी महामार्गासाठी अंदाजे १९,१४२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग नाशिक, अहिल्यानगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांतून जाणार आहे.
नाशिकच्या आडगाव परिसरात हा महामार्ग मुंबई-आग्रा महामार्गाला जोडण्यात येणार असून, समृद्धी महामार्गाशीही त्याची सांगड घालण्यात येणार आहे. वाढवण बंदराजवळ दिल्ली-मुंबई जलद मार्गाशी जोडणी करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन आहे.
या महामार्गामुळे नाशिक-अक्कलकोट प्रवासाचा वेळ सुमारे चार तासांनी कमी होणार असून, सुमारे ५१ किलोमीटर अंतराची बचत होईल. तसेच सुरत ते चेन्नई दरम्यान होणाऱ्या मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा वेळ सुमारे १४ तासांनी कमी होऊन २०१ किलोमीटर अंतराची बचत होण्याचा अंदाज आहे.
केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माहितीनुसार, महामार्गासाठी आवश्यक असलेल्या ९० टक्के जमिनीच्या भूसंपादनाची अधिसूचना आधीच जाहीर झाली आहे.
काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, या कालावधीत मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. नाशिकच्या विकासाला चालना देणारा हा महामार्ग राज्यातील दळणवळण नकाशाच बदलणारा ठरणार आहे.













