Havaman Andaj : राज्यात सध्या थंडीची तीव्र लाट सक्रिय नसली, तरी गारठा आणि तापमानातील चढ-उतार कायम असल्याचे चित्र दिसत आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भासह मुंबई आणि परिसरातही हवामानात अस्थिरता जाणवत असून, बदलत्या वाऱ्यांच्या दिशेमुळे हिवाळा आता हळूहळू निरोप घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. जानेवारी महिन्यातच पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गाचे लक्ष हवामानाकडे लागून राहिले आहे.
राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये दुपारच्या वेळेस आर्द्रतेत वाढ होत असून, त्यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. पुढील २४ तासांत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर तसेच संपूर्ण कोकण पट्ट्यात आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

घाटमाथ्यावर पहाटे व संध्याकाळी धुक्याची चादर पसरलेली दिसण्याची शक्यता असून, या भागातील कमाल तापमान सरासरी ३२ अंश सेल्सिअसपर्यंत राहणार आहे. किमान तापमान मात्र १५ अंशांच्या खाली जाण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ढगाळ वातावरणाचा सर्वाधिक परिणाम उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, धुळे या परिसरात ढगाळ हवामान कायम राहणार असून, काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद होऊ शकते.
अचानक पडणाऱ्या पावसामुळे उष्णतेत वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र ढगाळ वातावरण, सकाळ-संध्याकाळ हलका गारठा आणि दुपारी उष्णता असे मिश्र स्वरूपाचे हवामान अनुभवास येणार आहे.
हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातून ताशी २५ ते ३० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दमट वातावरण निर्माण झाले आहे. पुढील दोन दिवसांत हवामानात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता असली, तरी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज कायम आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या २४ तासांत एक नवा पश्चिमी झंझावात सक्रिय होणार आहे. यामुळे उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये जोरदार हिमवर्षाव, तर मैदानी भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२८ जानेवारीनंतर राज्यातील तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून, त्यानंतर थंडीचा परतीचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.













