Havaman Andaj : राज्यातील हवामानात सातत्याने मोठे बदल होताना दिसत आहेत. डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी जाणवली, मात्र जानेवारी महिन्यात थंडी, पाऊस आणि ढगाळ वातावरण अशा तिन्ही गोष्टींचा अनुभव नागरिकांना येत आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली असून त्यामुळे तापमानात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी अचानक गारठा वाढला, तर काही भागांमध्ये पावसामुळे वातावरणात दमटपणा निर्माण झाला आहे.

मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काल अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला.
याचा थेट परिणाम शेतीवर होत असून पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वीच अवकाळी पावसाने राज्यात मोठे नुकसान केले होते. आता पुन्हा पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.
दरम्यान, देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या तीव्र थंडीचा कहर सुरू आहे. काही भागांमध्ये हिमवृष्टी होत असून तापमानात सातत्याने घसरण होत आहे.
राजस्थानच्या अलवार येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद झाली असून तेथे 4.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील धुळे येथे किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे.
हवामानातील बदलांसोबतच राज्यातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणातही मोठी वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाच्या समस्या जाणवत असून अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा जारी केला आहे.
पुढील 24 तासांसाठी भारतीय हवामान विभागाने देशातील आठ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश, सिक्कीम, छत्तीसगड आणि उत्तराखंड या राज्यांचा यात समावेश आहे.
या भागांमध्ये पावसासोबत 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. विशेषतः 28 जानेवारी रोजी उत्तराखंडमध्ये गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि तब्बल 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून पुढील काही दिवस हवामानावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.













