पहिल्यांदा घर खरेदी करताय ? ‘या’ 8 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा !

पहिल्यांदाच घर खरेदी करताना अनेक आर्थिक आणि कायदेशीर बाबींची काळजी घेणे आवश्यक असते. आपल्या एका चुकलेल्या निर्णयामुळे भविष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात. फक्त आर्थिकच नाही तर इतरही काही अडचणी तुम्हाला त्रास देऊ शकतात.

Tejas B Shelar
Published:

Home Buying Tips : आपल्या कुटुंबासाठी घर खरेदी करणे हे माझे, तुमचे, आपले सर्वांचे एक मोठे स्वप्न असते. पण, घर खरेदी करणे ही सोपी बाब नाही. घरासाठी आपण आपल्या आयुष्यात कमावलेली सर्व संपत्ती खर्ची करत असतो. म्हणून घर खरेदी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी नाहीतर मग भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

विशेषतः पहिल्यांदाच घर खरेदी करताना अनेक आर्थिक आणि कायदेशीर बाबींची काळजी घेणे आवश्यक असते. आपल्या एका चुकलेल्या निर्णयामुळे भविष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात. फक्त आर्थिकच नाही तर इतरही काही अडचणी तुम्हाला त्रास देऊ शकतात.

घर ही आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहे यामुळे घर खरेदी करताना घाई गडबड करणे उचित नाही. त्यामुळे घर खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबींचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. आता आपण घर खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याची तपशीलवार माहिती जाणून घेणार आहोत.

1. योग्य बजेट ठरवा : घर खरेदी करताना सर्वप्रथम आपले बजेट ठरवा. तुमच्या सध्याच्या उत्पन्नाचा आणि भविष्यातील अंदाजित आर्थिक स्थितीचा विचार करूनच घरामध्ये गुंतवणुकीचा निर्णय घ्या. घराच्या किमतीव्यतिरिक्त नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क, ब्रोकर फीस, इंटिरिअर डिझाईन यासारख्या अतिरिक्त खर्चांचा विचार करणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.

2. गृहकर्ज घेण्याआधी सर्वांगी विचार करा : जर तुम्ही गृहकर्ज घेत असाल, तर व्याजदर आणि परतफेडीचे निकष लक्षात घ्या. विविध बँका आणि वित्तसंस्थांच्या गृहकर्ज योजनांची तुलना करा. शक्य असल्यास अधिक डाउन पेमेंट करून कर्जाची रक्कम कमी ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून भविष्यात ईएमआयचा भार कमी पडेल.

3. लोकेशन आणि कनेक्टिव्हिटीचा विचार करा : घर खरेदी करताना लोकेशन अत्यंत महत्त्वाचे असते. घराची भविष्यातील किंमत वाढेल का, परिसर सुरक्षित आहे का, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा आहेत का, याचा विचार करा. शाळा, हॉस्पिटल, मार्केट, मेट्रो किंवा बसस्टॉप अशा मूलभूत सुविधांची सहज उपलब्धता असणे महत्त्वाचे आहे.

4. कायदेशीर कागदपत्रे तपासा : घर खरेदी करताना संबंधित प्रॉपर्टीची सर्व कायदेशीर कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्या. बिल्डरकडे RERA (Real Estate Regulatory Authority) नोंदणी आहे का, प्रॉपर्टीवर कोणतेही बंधन नाही ना, हे सुनिश्चित करा. तसेच, विकासक किंवा बिल्डर विश्वसनीय आहे का, याची पडताळणी करा.

5. लँड टायटल आणि नोंदणी प्रक्रिया स्पष्ट करा : घर खरेदी करताना जमीन किंवा प्रॉपर्टीचे टायटल कोणाच्या नावावर आहे, याची खातरजमा करा. कोणताही कायदेशीर वाद नाही याची खात्री करण्यासाठी अनुभवी वकीलाची मदत घ्या. घराची नोंदणी करताना स्टॅम्प ड्युटी आणि इतर सरकारी शुल्कांचा विचार करा.

6. भविष्यकालीन गरजांचा विचार करा : घर खरेदी करताना केवळ सध्याच्या गरजा नव्हे, तर भविष्यातील गरजांचाही विचार करा. कुटुंब मोठे होणार आहे का, भविष्यात स्थलांतर करण्याची शक्यता आहे का, यासारख्या मुद्द्यांचा विचार करून निर्णय घ्या.

7. पुनर्विक्री आणि भाडे उत्पन्नाचा अंदाज घ्या : जर तुम्ही गुंतवणुकीसाठी घर खरेदी करत असाल, तर त्या घराची भविष्यातील पुनर्विक्री किंमत आणि भाडे मिळण्याची संधी किती आहे, हे तपासून पाहा. लोकांच्या राहणीमानातील बदल लक्षात घेऊन योग्य निर्णय घ्या.

8. घराचा दर्जा आणि बांधकामाची गुणवत्ता तपासा : घर खरेदी करण्यापूर्वी त्या प्रकल्पाचे बांधकाम गुणवत्ता प्रमाणपत्र (Occupancy Certificate) आणि स्ट्रक्चरल स्थिरता यासंबंधी माहिती मिळवा. घराचा दर्जा, वॉटरप्रूफिंग, वीज पुरवठा, जलपुरवठा, वायुवीजन अशा गोष्टींची खात्री करून घ्या.

खरेतर, पहिल्यांदा घर खरेदी करणे हा आपल्या आयुष्यातील एक मोठा निर्णय असतो. त्यामुळे उत्साहापेक्षा योग्य नियोजन आणि आर्थिक शहाणपण अधिक महत्त्वाचे आहे. योग्य माहिती आणि विश्वासार्ह तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास घर खरेदीचा अनुभव सुकर आणि फायदेशीर ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe