नोकरीवर असणाऱ्या लोकांना घर खरेदी करणे फायद्याचे ठरणार की भाड्याने राहणे ? तज्ञ काय सांगतात….

Published on -

Home Buying Tips : आपल्यापैकी अनेकांचे स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न असेल. तुम्ही सुद्धा असेच स्वप्न पाहिले असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरे तर नोकरी लागली की पहिले स्वप्न असते घराचे. नोकरीनंतर मी आधी घर बनवणार आणि त्यानंतर मग बाकी गोष्टी करू असा विचार अनेक जण करतात.

पण नोकरीवर असणाऱ्या लोकांनी मग ती सरकारी नोकरी असो किंवा खाजगी त्यांनी भाड्यात राहणे चांगले की घर विकत घेणे चांगले ? असा प्रश्न उपस्थित केला जातो. खरेतर, नोकरीवर असणाऱ्यांसाठी घर खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे यातील निर्णय घेणे आव्हानात्मक असू शकते.

हा निर्णय नोकरीची स्थिरता, उत्पन्न आणि भविष्यातील नियोजन यावर अवलंबून असतो. पण आता या दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय चांगला असू शकतो ? हे समजून घेऊयात.

भाड्याने राहण्याचे फायदे अन तोटे काय?

जर नोकरी किंवा उत्पन्न स्थिर नसेल तर भाड्याने घर घेणे अधिक अर्थपूर्ण आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात डाउन पेमेंट किंवा कर्जाची आवश्यकता नसते. जर तुम्ही कधी तुमची नोकरी गमावली तर भाडे भरणे हे ईएमआय भरण्यापेक्षा सोपे आहे.

शिवाय, भाड्याने घर घेतल्याने तुम्हाला स्थलांतर करण्याचे स्वातंत्र्य मिळते, म्हणजेच तुम्हाला नोकरी किंवा शहर बदलण्याची गरज नाही. पण भाड्याने राहण्याचे काही नुकसान सुद्धा आहेत. जसे की तुम्ही जे भाडे भरता ती रक्कम तुमच्या काहीच कामाची नसते. भाड्यात गेलेली रक्कम तुमची संपत्ती बनवत नाही. भाड्यात गेलेली रक्कम ही खर्च म्हणून गणली जाते.

घर खरेदी करण्याचे फायदे आणि तोटे

जर तुमची नोकरी स्थिर असेल आणि उत्पन्नात सातत्याने वाढ होत असेल, तर ईएमआयवर घर खरेदी करणे हा एक चांगला निर्णय असू शकतो. भाडे देण्याऐवजी ईएमआय फायद्याचा पर्याय ठरू शकतो. कारण EMI निश्चित असतात आणि काही वर्षांतच घर तुमची मालमत्ता बनते.

भविष्यात मालमत्तेच्या किमती वाढल्या तर ही एक उत्तम गुंतवणूक सुद्धा ठरू शकते. पण ईएमआयवर घर खरेदी करणे देखील जोखीम घेऊन येते. समजा 1 लाख पगाराचा माणूस 60 लाख रुपयांचा फ्लॅट खरेदी करतो आणि त्याचा ईएमआय 60 हजार रुपये असतो.

आता जर त्यांची नोकरी गेली तर एवढा मोठा ईएमआय भरणे त्याला नक्कीच कठीण होईल. म्हणूनच, तज्ञ आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी किमान 6 महिन्यांचे ईएमआय बचतीत ठेवण्याची शिफारस करतात.

भाडे किंवा ईएमआयचे काय करायचे?

तुम्हाला घर घ्यायचं आहे की भाड्याने राहायचं ? शेवटी, हा निर्णय तुमच्या आर्थिक परिस्थितीवर आणि भविष्यातील योजनांवर अवलंबून असतो. जर तुमची नोकरी स्थिर असेल आणि उत्पन्नात अपेक्षित वाढ असेल, तर घर खरेदी करणे हा एक चांगला पर्याय आहे.

पण, जर तुमचे उत्पन्न अनिश्चित असेल किंवा तुम्हाला वारंवार शहरांमध्ये स्थलांतर करावे लागत असेल, तर भाड्याने घर घेणे हा योग्य पर्याय असू शकतो. थोडक्यात घर खरेदी करणे किंवा भाड्याने राहणे हे सर्वस्वी तुमच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News