Home Loan : सात फेब्रुवारी 2025 रोजी रिझर्व बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला. या अंतर्गत पाच वर्षात पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली. 5 वर्षात पहिल्यांदाच रेपो रेटमध्ये बदल करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला. आरबीआयच्या निर्णयामुळे रेपो रेट 6.50 टक्क्यांवरून 6.25% पर्यंत खाली आला. मात्र आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात केल्यानंतर सुद्धा बँकांकडून आपले कर्जाचे व्याजदर कमी केले जात नव्हते.
पण आता सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे देशातील सहा बड्या बँकांनी व्याजदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार अशी आशा आहे.
आरबीआय ने 7 फेब्रुवारीला रेपोरेटमध्ये 0.25% ची कपात करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून बँका गृहकर्जाचे दर कमी करतील, अशी अपेक्षा बहुतांश गृहकर्ज खरेदीदारांना होती. मात्र आरबीआयच्या निर्णयानंतर एक आठवडा उलटला तरी बँकांनी हा निर्णय काही घेतला नाही.
पण आता देशातील 6 बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात कपात केली आहे. अशा परिस्थितीत आज आपण देशातील कोणत्या बँकांनी गृह कर्जावरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे याची माहिती पाहणार आहोत.
‘या’ बँकांनी गृह कर्जावरील व्याज दरात कपात केली
इंडियन ओव्हरसीज बँक – इंडियन ओव्हरसीज बँकेनं (IOB) आपल्या ग्राहकांना दिलासा देत आरएलएलआर मध्ये 25 बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. आरएलएलआर आता 9.35 टक्क्यांवरून 9.10 टक्क्यांवर आणला आहे. नवे दर गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच 11 फेब्रुवारीपासून लागू आहेत.
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) – पंजाब नॅशनल बँकेने सुद्धा आपल्या ग्राहकांना दिलासा दिला असून आपला आरएलएलआर 9.25 टक्क्यांवरून 9 टक्क्यांवर आणलाय. महत्त्वाचे म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून म्हणजेच 10 फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू आहेत.
युनियन बँक ऑफ इंडिया – या बँकेने सुद्धा आपल्या ग्राहकांना दिलासा दिला असून आपला आरएलएलआर 9.25 टक्क्यांवरून 9 टक्क्यांवर आणलाय. महत्त्वाचे म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच 11 फेब्रुवारीपासून हे नवे दर लागू आहेत.
बँक ऑफ बडोदा – बँक ऑफ बडोदाने सुद्धा आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. बँकेने आपले बडोदा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (बीआरएलएलआर) 8.90% पर्यंत कमी केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे बँकेचे हे नवे दर तीन दिवसांपासून म्हणजेच 10 फेब्रुवारीपासून लागू आहेत.
बँक ऑफ इंडिया – बँक ऑफ इंडियानं आरएलएलआर 9.35 टक्क्यांवरून 9.10 टक्क्यांवर आणला आहे. सर्वप्रथम याच बँकेने या दरात कपात केली. बँकेचे हे नवे दर 7 फेब्रुवारीपासून लागू आहेत.
कॅनरा बँक – कॅनरा बँकेनं आपला आरएलएलआर 9.25 टक्क्यांवरून 9.00 टक्क्यांवर आणला आहे. यामुळे या बँकेच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असला तरी देखील बँकेचा हा नवा दर 12 फेब्रुवारी 2025 पासून लागू होणार असून, केवळ 12 फेब्रुवारीला किंवा त्यानंतर उघडलेल्या खात्यांनाच हे दर लागू होतील. किंवा मग आरएलएलआर प्रणालीमध्ये 3 वर्षे पूर्ण केलेल्या ग्राहकांनाच या नव्या दराचा फायदा होणार आहे.