Home Loan News : नव्याने गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांच्या काळात देशभरातील अनेक बँकांनी गृहकर्ताच्या व्याजदरात कपात केली आहे. आरबीआय ने रेपो रेट मध्ये मोठी कपात केली असल्याने आता बँका देखील विविध कर्जांचे व्याजदर कमी करत आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडिया ने देखील गृह कर्जाचे व्याजदर कमी केले आहे. यामुळे आपणास गृह कर्ज घ्यायचे असेल तर देशातील सर्वाधिक मोठी सरकारी बँक म्हणजेच एसबीआयचा पर्याय बेस्ट राहणार आहे.

खरेतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अलीकडेच संपन्न झालेल्या MPC च्या बैठकीत पुन्हा एकदा रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला. देशाच्या मध्यवर्ती बँकेने चलनविषयक धोरणात मोठा बदल करत रेपो रेटमध्ये एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली आहे.
या निर्णयाचा थेट फायदा सर्वसामान्य ग्राहकांना होत असून बँकांकडील कर्जे आता अधिक स्वस्त झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या कर्जदरात लक्षणीय कपात केली आहे.
एसबीआयने गृहकर्जासाठीचा प्रारंभिक व्याजदर आता केवळ ७.२५ टक्के इतका निश्चित केला असून, सध्याच्या बाजारात हा दर अत्यंत स्पर्धात्मक मानला जात आहे. त्यामुळे पहिल्यांदाच घर खरेदी करणारे तसेच आधीचे कर्ज ट्रान्सफर करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते.
रेपो रेट कपातीमुळे बँकांचा निधी उभारणीचा खर्च कमी झाला असून, त्याचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न SBI कडून करण्यात आला आहे. जर एखाद्या ग्राहकाने ३० वर्षांच्या कालावधीसाठी ५० लाख रुपयांचे गृहकर्ज ७.२५ टक्के व्याजदराने घेतले, तर त्याला दरमहा सुमारे ३४,५०० रुपये EMI भरावा लागेल.
बँकांच्या नियमानुसार, ग्राहकाच्या मासिक उत्पन्नाच्या साधारण ५० टक्क्यांपर्यंत EMI ग्राह्य धरला जातो. त्यामुळे अशा कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न अंदाजे ६९,००० रुपये असणे आवश्यक ठरते. मात्र कर्ज मंजुरी केवळ उत्पन्नावरच अवलंबून नसते.
अर्जदाराच्या नावावर आधीपासून कोणतेही कर्ज सुरू असल्यास, बँक कर्जपात्रतेचा नव्याने आढावा घेते. तसेच क्रेडिट स्कोर हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. ७५० पेक्षा अधिक क्रेडिट स्कोर असल्यास कर्ज मंजुरी सोपी होते आणि कमी व्याजदराचा लाभ मिळण्याची शक्यता वाढते.
तज्ज्ञांच्या मते, मजबूत आर्थिक शिस्त, नियमित उत्पन्न आणि चांगला क्रेडिट इतिहास असल्यास ग्राहक बँकेकडे व्याजदरात अतिरिक्त सवलतीची मागणीही करू शकतात. त्यामुळे सध्याच्या कमी व्याजदरांच्या वातावरणात गृहकर्ज घेण्याची ही योग्य वेळ असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.