मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे तिकीट किती असणार ? कसं राहणार वेळापत्रक? रेल्वे मंत्र्यांकडून मोठे अपडेट

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल प्रकल्पाबाबत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर अलीकडेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती दिली होती.

त्यांनी हा प्रकल्प कधीपर्यंत सेवेत येणाऱ्या संदर्भात माहिती दिली होती. आज पुन्हा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. बुलेट ट्रेन मार्गाचे वेळापत्रक कसे राहणार आणि या मार्गावरील बुलेट ट्रेन चे तिकीट किती असणारे या संदर्भात रेल्वे मंत्र्यांकडून काही संकेत मिळत आहेत.

देशातील पहिल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरवर सुरुवातीच्या टप्प्यात गर्दीच्या वेळांमध्ये दर १५ ते २० मिनिटांच्या अंतराने बुलेट ट्रेन धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे मंत्रालय याबाबत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

तसेच प्रवाशांची मागणी वाढल्यास ही वारंवारता आणखी वाढवून गर्दीच्या वेळांमध्ये दर १० मिनिटांनी एक बुलेट ट्रेन धावेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. अश्विनी वैष्णव म्हणाले की, हा कॉरिडॉर म्हणजेच मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर देशात एका नव्या आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेची सुरुवात होईल. या प्रकल्पामुळे मुंबई आणि अहमदाबाद या दोन महत्त्वाच्या शहरांमधील प्रवासाचा कालावधी दोन तासांपेक्षा कमी होणार आहे.

सध्या या अंतरासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने उद्योग, व्यापार आणि दैनंदिन प्रवासाला मोठी चालना मिळेल. या प्रकल्पाचे महत्त्व सांगताना रेल्वेमंत्र्यांनी उदाहरण दिले की, भविष्यात एखादा प्रवासी सकाळी नाश्ता करून बुलेट ट्रेनने कामासाठी मुंबईला जाऊ शकेल आणि संध्याकाळी पुन्हा सूरतला परत येऊ शकेल.

अशा प्रकारची विना-अडथळा, जलद आणि विश्वासार्ह कनेक्टिव्हिटी या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे. त्यांनी हेही नमूद केले की, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर ‘इंटिग्रेशन आणि मल्टिप्लायर’ असा मजबूत परिणाम होणार आहे.

बुलेट ट्रेनच्या तिकिटांच्या दराबाबत विचारले असता, हे भाडे मध्यमवर्गीयांना परवडणारे असेल, असे आश्वासनही रेल्वेमंत्र्यांनी दिले. त्यामुळे केवळ उच्च उत्पन्न गटापुरतेच नव्हे, तर सामान्य प्रवाशांसाठीही ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

दरम्यान, बुलेट ट्रेन प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात डोंगरातून जाणाऱ्या एका बोगद्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. सध्या एकूण आठ बोगद्यांचे काम सुरू असून, त्यापैकी सात बोगदे महाराष्ट्रात तर एक बोगदा गुजरातमध्ये उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या बांधकाम टप्प्यात निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधींमुळे सुमारे एक लाख लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभ झाल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.