Phonepe, Google pay News : फोन पे , गुगल पे , पेटीएम वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरे तर आजच्या या स्मार्टफोनच्या युगात सगळी कामे ऑनलाईन होत आहेत. पैशांचे व्यवहार सुद्धा बऱ्यापैकी ऑनलाईन झाले आहेत. अलीकडे युपीआय (UPI) मुळे पैशांचे व्यवहार अतिशय जलद आणि सोपे झाले आहेत.
यूपीआय व्यवहारांसाठी तुम्ही आम्ही सर्वजण फोन पे गुगल पे पेटीएम अशा यूपीआय एप्लीकेशन चा वापर करतो. यूपीआय एप्लीकेशन मुळे आता चहा-पाण्यापासून मोठ्या व्यवहारांपर्यंत सर्व काही एका क्लिकवर होत आहे. यूपीआय एप्लीकेशनच्या मदतीने फक्त एका क्लिकवर येथून हजारो किलोमीटर लांबीवर बसलेल्या व्यक्तीला अवघ्या दोन सेकंदात पैसे पाठवता येतात.

मात्र, यूपीआय एप्लीकेशन मुळे पैशांचे व्यवहार जेवढे सोपे झाले आहेत तेवढेच गुंतागुंतीचे सुद्धा होतात. अनेकदा आपण चुकीने ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याला सोडून दुसऱ्याच एखाद्या व्यक्तीला पैसे पाठवतो. घाईगडबडीत अनेकदा पैसे चुकीच्या युपीआय आयडीवर किंवा भलत्याच व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर होतात.
अशा वेळी साहजिक आपले पैसे कायमचे गेले की काय, अशी भीती वाटते. पण, खरंच चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवले गेले तर ते पैसे रिटर्न मिळत नाहीत का ? चुकीच्या व्यक्तीला पाठवलेले पैसे परत मिळवण्याची प्रोसेस नेमकी कशी असते? याचबाबतची माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
खरेतर , युपीआय व्यवहार पूर्णपणे ट्रॅकेबल असतात आणि वेळेत योग्य प्रक्रिया केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता पण वाढत असते. आता आपण चुकीच्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवत्यास ते पैसे परत मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेणार आहोत.
काय आहे प्रक्रिया?
चुकीचा व्यवहार झाल्याचं लक्षात येताच सर्वात आधी त्या व्यवहाराची संपूर्ण माहिती नोंदवून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये UTR नंबर, व्यवहाराची तारीख व वेळ, पाठवलेली रक्कम आणि रिसीव्हरचं नाव किंवा युपीआय आयडी अशी महत्त्वपूर्ण माहिती नोंदवून ठेवावी.
अनेकदा व्यवहार पूर्ण झालेला नसतो मात्र आपण घाई गडबडीत व्यवहार पूर्ण झाल्याचे समजतो. यामुळे जो व्यवहार चुकीचा झाला आहे तो पण पूर्ण झाला आहे की नाही याची पडताळणी करावी. म्हणजेच चुकीचा व्यवहार पेंडिंग मध्ये नाही ना हे पाहूनच पुढील प्रक्रिया सुरू करावी.
दरम्यान व्यवहार पूर्ण झाल्याचे निष्पन्न झाल्यास ज्या युपीआय ॲपवरून व्यवहार केला आहे (Google Pay, PhonePe, Paytm इत्यादी), त्यावर त्वरित तक्रार नोंदवावी. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन ‘Report a Problem’ किंवा ‘Payment Issue’ हा पर्याय निवडून ‘Sent to Wrong Person’ असं कारण नमूद करावं.
यामुळे तक्रारीचा अधिकृत रेकॉर्ड तयार होतो. ॲपवरील तक्रारीसोबतच संबंधित बँकेशी संपर्क साधणंही तितकंच गरजेचं आहे. बँकेच्या कस्टमर केअरवर कॉल करून किंवा शाखेत जाऊन UTR नंबर आणि स्क्रीनशॉट द्यावा. बँक रिसीव्हरच्या बँकेशी संपर्क साधून पैसे परत करण्याची विनंती करते.
मात्र, रिसीव्हरच्या संमतीशिवाय थेट पैसे वजा करता येत नसल्यामुळे ही प्रक्रिया थोडी वेळखाऊ ठरू शकते. शक्य असल्यास, रिसीव्हरशी थेट नम्रपणे संपर्क साधणं हा देखील एक प्रभावी मार्ग ठरतो. बहुतांश वेळा समोरची व्यक्ती सहकार्य करून पैसे परत करते.
तरीही प्रश्न सुटला नाही, तर NPCI च्या डिस्प्यूट रिड्रेसल प्रणालीत किंवा अंतिम पर्याय म्हणून RBI लोकपालाकडे तक्रार करता येते. थोडक्यात, चुकीच्या युपीआय व्यवहारात घाबरून न जाता वेळेत आणि योग्य पावलं उचलल्यास आपले पैसे परत मिळवणं नक्कीच शक्य आहे.











