India Post Recruitment : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तसेच सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांसाठी तब्बल २८ हजार ७४० जागांची मेगाभरती जाहीर केली आहे. २०२६ मधील ही सर्वात मोठ्या भरतींपैकी एक असून, ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.
भारतीय डाक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या भरती अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्टर (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) अशा विविध पदांचा समावेश आहे. देशभरातील एकूण २३ डाक सर्कलमध्ये ही भरती होणार असून, मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ही पूर्णपणे दहावीच्या गुणांच्या आधारे केली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा ताण न घेता, दहावी उत्तीर्ण उमेदवारांना थेट सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्जप्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असून, इच्छुक उमेदवारांना indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
पात्रतेबाबत सांगायचे झाल्यास, उमेदवार किमान १०वी पास असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असावे. सरकारी नियमांनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.
पगाराच्या बाबतीतही ही नोकरी आकर्षक आहे. ग्रामीण डाक सेवक (GDS) पदासाठी १०,००० ते २४,४७० रुपये दरमहा पगार मिळणार आहे. शाखा पोस्टमास्टर (BPM) पदासाठी १२,००० ते २९,३८० रुपये पगार निश्चित करण्यात आला आहे. हा पगार केंद्र सरकारच्या नियमानुसार भविष्यात वाढवला जाणार आहे.
एकूणच, कोणतीही परीक्षा नसलेली, १०वी पास पात्रतेची आणि स्थिर पगाराची ही भरती तरुणांसाठी मोठी संधी असून, इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.













