Indian Oil Job : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीची सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑइलने आपल्या पाइपलाइन डिव्हिजनसाठी अप्रेंटिस पदांची भरती जाहीर केली असून, यामध्ये एकूण ३९४ जागा भरल्या जाणार आहेत.
सरकारी कंपनीत काम करण्याची संधी मिळण्यासोबतच, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि स्टायपेंडही मिळणार असल्यामुळे ही भरती तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

इंडियन ऑइलकडून या भरतीसंदर्भातील अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना iocl.com या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येणार आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून म्हणजेच २८ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२६ आहे. उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत अर्ज करणे आवश्यक आहे.
ही भरती आसाम, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये केली जाणार आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यांतील उमेदवारांना या भरतीचा लाभ घेता येणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २४ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, टेक्निशियन अप्रेंटिस (ट्रेड) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेला असावा.
ट्रेड अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांकडे संबंधित विषयातील बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. तसेच डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी १२वी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करू शकतात.
अप्रेंटिसशिप दरम्यान उमेदवारांना नियमानुसार स्टायपेंड दिले जाणार असून, यामुळे तरुणांना आर्थिक आधार मिळणार आहे. सरकारी कंपनीत अप्रेंटिसशिप केल्यामुळे भविष्यातील नोकरीच्या संधींसाठी हा अनुभव उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ही संधी न दवडता वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.













