Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पारदर्शक करण्यासाठी गेल्या काही महिन्यांत अनेक महत्त्वाचे नियम लागू केले आहेत.
रेल्वेतील तिकीट बुकिंगमधील गैरप्रकार, अनधिकृत प्रवास, जादा सामान आणि वेटिंग तिकिटांवरील गोंधळ यावर आळा घालण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. येत्या काळात ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर हे नियम जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

तत्काल तिकिटांमधील दलाली आणि बॉट्सद्वारे होणारा गैरवापर रोखण्यासाठी रेल्वेने आधार कार्ड बंधनकारक केलं आहे. IRCTC वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरून तत्काल तिकीट बुक करण्यासाठी IRCTC खाते आधारशी लिंक असणं आवश्यक आहे.
ज्यांचं आधार व्हेरिफिकेशन पूर्ण झालेलं नाही, ते प्रवासी आता तत्काल तिकीट बुक करू शकणार नाहीत. यामुळे खऱ्या प्रवाशांना तिकीट मिळण्याची संधी वाढणार आहे.
सामान्य प्रवाशांना प्राधान्य मिळावं यासाठी एजंट बुकिंगवरही मर्यादा घालण्यात आली आहे. तत्काल विंडो उघडल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांत एजंटना तिकीट बुकिंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.
AC कोचसाठी एजंट बुकिंग सकाळी 10.30 नंतर, तर नॉन-AC (स्लीपर) साठी सकाळी 11.30 नंतर सुरू होणार आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांना थेट तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल.
रेल्वेने स्पष्ट केलं आहे की, कन्फर्म तिकीटाशिवाय प्रवास करणं बेकायदेशीर आहे. वेटिंग किंवा रद्द झालेल्या तिकिटावर प्रवास केल्यास दंड आकारला जाऊ शकतो किंवा संबंधित प्रवाशाला ट्रेनमधून खाली उतरवलं जाऊ शकतं. हा नियम काउंटर आणि ऑनलाइन दोन्ही तिकिटांसाठी लागू आहे.
रिझर्व्हेशन चार्ट तयार करण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. आता ट्रेन सुटण्यापूर्वी किमान 10 तास आधी चार्ट तयार केला जाणार आहे. यामुळे वेटिंग तिकीटधारकांना वेळेआधीच तिकीट कन्फर्म झालं की नाही याची माहिती मिळेल आणि प्रवासाचे पर्यायी नियोजन करता येईल.
याशिवाय, विमानप्रवासाप्रमाणेच रेल्वेतही कोचनुसार सामान मर्यादा ठरवण्यात आली आहे. फर्स्ट AC साठी 70 किलो, सेकंड AC साठी 50 किलो, थर्ड AC आणि स्लीपरसाठी 40 किलो, तर जनरल कोचसाठी 30 किलोपर्यंत सामान नेण्याची परवानगी आहे. मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यास अतिरिक्त शुल्क किंवा कारवाई होऊ शकते.
आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे, प्रवासी जर आपल्या बोर्डिंग स्टेशनवर ट्रेनमध्ये चढला नाही, तर त्याची सीट थेट RAC किंवा वेटिंग तिकीटधारकाला दिली जाईल.
याआधी TTE पुढील स्टेशनपर्यंत प्रतीक्षा करत असत, मात्र आता ही सवलत रद्द करण्यात आली आहे. हे सर्व नियम लक्षात घेता, प्रवाशांनी प्रवासापूर्वी योग्य माहिती घेणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे.













