Indias First Hydrogen Train : भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वेच्या प्रवासात एक नवीन क्रांती घडली आहे. वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता देशात हायड्रोजन ट्रेन सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनचा रूट सुद्धा फायनल झाला आहे. या गाडीमधून एकावेळी 2500 लोकांना प्रवास करता येणार असून यामुळे प्रदूषणाला आळा घालण्यास यश येईल अशी आशा व्यक्त होत आहे.

ही इको फ्रेंडली ट्रेन लवकरच हरियाणातील जिंद ते सोनीपत या मार्गावर सुरू होणार आहे. डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते आणि हेच प्रदूषण कमी करण्यासाठी आता हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहेत आणि देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन ही हरियाणा राज्यात सुरू होईल.
हायड्रोजन वर धावणारे इंजिन चालवण्यासाठी या उपक्रमाच्या अंतर्गत जिंद येथे एक विशेष ग्रीन हायड्रोजन प्लांट सुद्धा उभारण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. हा भारतातील सर्वात मोठा हायड्रोजन प्लांट असून याची साठवण क्षमता जवळपास 3000 kg एवढी आहे.
हा प्लांट फक्त जिंद ते सोनीपत या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या हायड्रोजन ट्रेन साठी बांधण्यात आला असून याचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे. जिंद ते सोनीपत हे अंतर 89 km चं असून या मार्गावर हायड्रोजन ट्रेन ताशी 110 ते 140 किलोमीटर वेगाने धावेल अशी माहिती देण्यात आली आहे.
या वेगात गाडी धावली तर 89 किलोमीटरचा अंतर पार करण्यासाठी एक तासाचा वेळ लागेल. या मार्गावर सध्या ज्या डिझेल गाड्या सुरू आहेत त्यांना जवळपास 120 मिनिटांचा म्हणजे दोन तासांचा वेळ लागतो पण हायड्रोजन ट्रेन सुरू झाल्यानंतर हा वेळ निम्म्याने कमी होणार आहे.
या मार्गावर एकूण सहा स्थानके आहेत, ज्यामुळे या गाडीचा या मार्गावर प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या गाडीच्या तिकीट दराबाबत बोलायचं झालं तर या गाडीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना पाच रुपयांपासून ते 25 रुपयांपर्यंतचे तिकीट काढावे लागणार आहे. ही ट्रेन बांधण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला 89 कोटी रुपयांचा खर्च आला असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे.













