बारावी पास शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग; खडकाळ माळरानावर फुलवला सीताफळाचा मळा, झाली लाखो रुपयांची कमाई

Published on -

Farmer Success Story : गेल्या काही वर्षांमध्ये राज्यासह संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. गारपीट, अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, दुष्काळ यांसारख्या एक ना अनेक संकटांमुळे शेतकऱ्यांना शेती पिकांमधून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही.

जर समजा या संकटांमधून शेतकऱ्यांनी थोडे बरे उत्पादन मिळवले तर शेतकऱ्यांच्या मालाला बाजारात अपेक्षित असा भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमधून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाहीये. परिणामी आता अनेकांनी शेती व्यवसाय सोडून इतर उद्योगधंद्यांमध्ये आपले नसीब आजमावायला सुरुवात केली आहे. मात्र या विपरीत परिस्थितीवर मात करत राज्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतीमधून चांगली कमाई करून दाखवली आहे.

आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत काही शेतकऱ्यांनी शेती मधून लाखो रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील मौजे कोकलेगाव येथील शेतकरी किशन जुन्ने यांनी त्यांच्या तीन एकर पडीक जमिनीवर सिताफळाची बाग फुलवून लाखोंची कमाई केली आहे.

खरंतर खडकाळ माळरान जमिनीवर फळबाग लावणे आणि त्यातून यशस्वी उत्पादन मिळवणे ही काही सोपी बाब नाही. मात्र जुन्ने यांनी ही अशक्य वाटणारी गोष्ट देखील शक्य करून दाखवली आहे. किशन यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. पण त्यांनी कंपनीत नोकरी करण्याऐवजी शेती करण्याचा निर्णय घेतला.

मात्र त्यांच्याकडे सुपीक आणि लागवडी योग्य जमीन नव्हती. त्यांच्याकडे तीन एकर पडीक असलेली माळराना जमीन होती. मग काय त्यांनी माळरान जमिनीवरच शेती करण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये त्यांनी फळबाग लागवड करायची असे ठरवले. त्यांनी बालानगरी जातीच्या सीताफळची लागवड केली.

त्यांनी सिताफळाची 1800 रोपे 60 रुपये प्रति नग याप्रमाणे खरेदी केले. सीताफळांची लागवड केली. पिकाची लागवड झाल्यानंतर गांडूळ खत आणि शेणखताचा वापर केला. पाण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली बसवली. सीताफळांची लागवड झाल्यानंतर व्यवस्थापन केल्यामुळे त्यांना पहिल्याच वर्षी एक लाख 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

त्यानंतर दरवर्षी उत्पन्नाचा हा आकडा वाढतच गेला. सध्या स्थितीला त्यांना सिताफळ बागेतून जवळपास तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. या सिताफळ बागेतून त्यांना दरवर्षी सहाशे कॅरेट पर्यंतचे उत्पादन मिळत आहे. फक्त सिताफळच नाही तर त्यांनी मोसंबी, पेरूची देखील लागवड केली आहे. आता या फळ पिकातून देखील त्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe