IRCTC Share Price : सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्यांकडून तिमाही निकाल जाहीर केले जात आहेत. काही कंपन्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची सुद्धा घोषणा करत आहेत. एवढेच नाही तर तिमाही निकाल जाहीर करण्याबरोबरच काही कंपन्यांकडून आपल्या गुंतवणूकदारांना डिविडंट देण्याची घोषणा सुद्धा केली जात आहे.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजे IRCTC ने सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना डिविडेंट देण्याची मोठी घोषणा केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या कंपनीचे तिमाही निकाल सुद्धा फारच समाधानकारक आहेत आणि कंपनीचा नफा चांगला वाढला आहे.
![IRCTC Share Price](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/IRCTC-Share-Price.jpeg)
पण तरीही याचे शेअर्स आज बुधवार 12 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या घसरणीसह 721.75 रुपयांवर ट्रेड करत आहेत. आज बीएसईवर (BSE) कंपनीच्या शेअर्सनी 3 टक्क्यांहून अधिक गटांगळी खाल्ली आहे आणि 52 आठवड्यांचा नवा नीचांक गाठलाय.
विशेष म्हणजे, चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत कंपनीने दमदार निकाल जाहीर केले असतानाही यामध्ये मोठी घसरण दिसून आली असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत आज आपण या स्टॉकची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
IRCTC चा नफा आणि महसूल वाढला तरी शेअर्स कोसळले
IRCTC ने डिसेंबर 2024 तिमाहीसाठी मजबूत आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीचा नफा 14 टक्क्यांनी वाढून 341 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत 300 कोटी रुपये होता. तसंच, एकूण महसूल 10 टक्क्यांनी वाढून 1224.7 कोटी रुपये झाला, जो वर्षभरापूर्वी 1115.5 कोटी रुपये होता.
कंपनीच्या EBITDA मध्येही 5.7 टक्क्यांची वाढ झाली असून तो 417 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच, आपल्या शेअरहोल्डर्ससाठी कंपनीकडून दुसरा अंतरिम लाभांश 3 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आला आहे, ज्यासाठी 20 फेब्रुवारी 2025 ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे.
शेअर्स का घसरले असावेत ?
IRCTC च्या दमदार निकालांनंतरही शेअर्समध्ये घसरण झाली, यामागे अनेक कारणे असू शकतात. मार्केटमधील दबाव सुद्धा कारण आहे. संपूर्ण भारतीय शेअर बाजार सध्या अस्थिरतेच्या टप्प्यात आहे, त्यामुळे गुंतवणूकदार नफावसुली करत आहेत. अन यामुळे या कंपनीचे स्टॉक सुद्धा गडगडले आहेत.
तसेच IRCTC च्या शेअर्सचे मूल्यांकन आधीच जास्त होते, त्यामुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांनी नफा बुक केला आहे. शिवाय रेल्वे मंत्रालयाच्या धोरणांमध्ये बदल किंवा नव्या कंपन्यांना संधी दिल्यास IRCTC वर परिणाम होणार अशी शक्यता पाहता या शेअर्सच्या किमती घसरल्यात असा दावा बाजारातील विश्लेषक करत आहेत.
IRCTC च्या शेअर्सचा मागील 5 वर्षांचा प्रवास
IRCTC च्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षांत 130 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. 14 फेब्रुवारी 2020 रोजी 311.49 रुपये असलेला शेअर 12 फेब्रुवारी 2025 रोजी 721.75 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या 4 वर्षांतही IRCTC च्या शेअर्सनी 105 टक्क्यांहून अधिक वाढ दाखवली आहे. मात्र, अलिकडच्या काळात शेअरच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.
गुंतवणूकदारांची पुढील रणनीती कशी असावी ?
IRCTC चा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मजबूत मानला जातो, मात्र सध्या अस्थिरतेमुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांसाठी सावधगिरीचा सल्ला दिला जात आहे.
विशेषतः, मार्च महिन्यात कंपनीच्या ताज्या धोरणात्मक घोषणांनंतर आणि बाजारातील स्थितीनुसार शेअरच्या किमतीत सुधारणा होऊ शकते. त्यामुळे, गुंतवणूकदारांनी बाजाराच्या चढ-उतारांचा अभ्यास करूनच पुढील निर्णय घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.